
श्रीनिवास बेलसरे
नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, राजकुमार, सितारादेवी अशा दिग्गजांना घेऊन मेहबूब खान यांनी काढलेला ‘मदर इंडिया’ (१९५७) तसा त्यांच्याच ‘औरत’चा (१९४०) रिमेक होता. जमीनदारीच्या काळातील एका गरीब शेतकरी महिलेने कुटील सावकाराशी दिलेला लढा हे त्याचे कथानक!
सिनेमाच्या नावामागे एक रोचक घटना होती. अमेरिकी लेखिका कॅथेरीन मेयो हिने १९२७ला याच नावाची कादंबरी प्रकाशित केली होती. तिच्यात तिने भारतीय संस्कृतीची यथेच्छ टिंगल केलेली होती. यामुळे व्यथित झालेल्या खान यांनी मुद्दाम सिनेमाला तेच नाव देऊन एक भारतीय ग्रामीण स्त्रीसुद्धा काय करू शकते ते जगाला दाखवून दिले. मात्र त्यांनी कच्ची फिल्म आयात करण्यासाठी परवानगी मागितली, तेव्हा देशाची बदनामी करणाऱ्या कादंबरीच्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळे सरकारने चक्क सिनेमाची संहिता ‘तपासणीसाठी’ मागवली!
मेहबूब खान यांनी सिनेमाच्या संहितेबरोबरच १७ सप्टेंबर १९५५ला सरकारला एक पत्रही पाठवले. त्यात त्यांनी म्हटले, “मी हे शीर्षक श्रीमती मेयो यांच्या कादंबरीने देशाची जी चुकीची प्रतिमा निर्माण केली आहे, ती स्वच्छ करण्यासाठीच मुद्दाम दिले. चित्रपट कादंबरीपेक्षा केवळ वेगळाच नाही, तर तिच्याविरुद्ध आहे!” याला म्हणतात देशाभिमान! सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. इतका की आजही सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या भारतीय सिनेमांच्या यादीत ‘मदर इंडिया’चे स्थान वरचे आहे.
सिनेमाचे अनेक ‘स्पेशल शो’ झाले. एक शो तर खास राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी करण्यात आला. सिनेमाला ‘सर्वोत्तम फिचर फिल्मचे गुणवत्तेचे अखिल भारतीय प्रमाणपत्र’, फिल्मफेअरचे ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट पारितोषिक’(१९५७), नर्गिसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर मेहबूब खान यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. याशिवाय ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ या अकादमी अॅवॉर्डसाठी नामांकन झालेला हा पहिला भारतीय सिनेमा ठरला.
एक वैशिष्ट्य म्हणजे सिनेमात नौशाद यांनी पहिल्यांदाच पाश्चिमात्य संगीताचा वापर केला होता. तिथून हिंदीत पाश्चिमात्य संगीताचा प्रवेश झाला. सिनेमातील १२ गाण्यांपैकी बहुतेक गाणी हिट झाली. मात्र दीदी, उषा आणि मीना मंगेशकरांच्या आवाजातले ‘दुनिया में हम आये हैं तो जिनाही पडेगा, जीवन हैं अगर जहर तो पिनाही पडेगा’ हे आणि ‘दुख भरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे...’ हे रफीसाहेब, आशाताई, शमशाद बेगम आणि मन्नाडे यांनी गायलेली ही गाणी हिंदी भाषा आहे, तोवर अमर राहणार! राहायला हवीत. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येकाला कधी न कधी या दोन्ही अनुभवातून जावे लागतेच - “जीवन हैं अगर जहर तो पिनाही पडेगा” आणि “...दुखभरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे!” सिनेमात या गाण्याच्या वेळी काय दिसतेय? गरीब शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने नांगरलेल्या शेतात चांगल्या पिकाची कापणी सुरू झाली आहे. किती साधा प्रसंग! पण आमच्या शकील बदायूंनी आणि मेहबूब खान यांनी त्याचे केवढे रम्य, सात्विक हृद्यस्पर्शी सेलिब्रेशन करून टाकलेय! त्या काळचे शायर इतके चिंतनशील की, त्यांचे मानवी जीवनावरचे सखोल चिंतन गाण्यात कुठूनतरी झिरपायचेच!
‘दुखभरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे,
रंग जीवन में नया लायो रे...’
या अतिशय कर्णमधुर, सुखद गाण्यातल्या अनेक ओळी कहर आहेत. अनेक कशाला? प्रत्येक ओळच म्हणा की! -
देख रे घटा घिरके आई, रस भर भर लाई,
छेड़ ले गोरी मनकी बिना, रिमझिम रुत छाई,
प्रेमकी गागर लाये रे बादल, विकल मोरा जिया होय...
दुखभरे दिन बीते रे भैया...
ढगातल्या पाण्याला शेतकरी ‘प्रेमकी गागर’ म्हणतोय यातच सगळे आले! ही भरून पाठवणारा कोण? तो शकीलसाहेबांचा अल्लाच ना? किंवा मन्नाडेंचा आणि आशाताईंचा कान्हाच! मग अंगाची इतकी लाही लाही करणारा उन्हाळा संपल्यावर आकाशात जमा झालेले हे काळे वत्सल ढग पाहून जिया “विकल” होणार नाही तर काय? म्हणजे आनंदही आणि दु:खाची आठवणही. वाह शकीलसाहेब, वाह!
पाऊस आला की रोमान्स आलाच. मग ते गरीब शेतकरी असले म्हणून काय झाले! राजेंद्रकुमार आणि त्याची प्रिया कुमकुम झोक्यावर बसले आहेत. एका झोक्यावर तो आणि एकावर ती! झोका इकडून जातो आणि तसाच परत येतो. पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनातले अमृत. केवढा आनंद आकाशातून बरसणाऱ्या ईश्वरी प्रेमाचा! इतके दिवस कसेही गेले तरी पाऊस आला की शेतकऱ्याला वाटते, संपले सर्व दु:ख, सरले सगळे दारिद्र्य! आता आपलेही चांगले दिवस येणार!
त्यातही पुन्हा शकीलसाहेब एक कटू सत्य लिहून जातातच - यौवनाची क्षणभंगुरता! कसली शब्दयोजना - म्हणे “सावन के संग आये जवानी, सावन के संग जाये!” काय शकीलसाहेब, आनंदातही दु:खाची आठवण दिलीच पाहिजे का? पण खरेच नाही का? तारुण्य, त्यातली ऊर्जा, प्रत्येक अनुभवाची नवलाई, भावनेची अपूर्वाई - सगळे किती लवकर संपते! एका ऋतूत नकळत आलेले तारुण्य किती नकळत आणि किती झटकन निघून जाते!
मधुर मधुर मनवा गाये, अपने भी दिन आये...
सावन के संग आये जवानी, सावन के संग जाए...
मनाला दिलासा देतानाच कवी भावी वास्तवाची जाण ठेवत स्वत:ला बेधुंद आनंदात झोकून द्यायला सांगतो. आजची सकारात्मक जीवनशैली तरी काय वेगळे सांगते आहे? हेच तर आमच्या शकील बदायू यांनी ६५ वर्षांपूर्वी सहज जाता जाता सांगितले होते -
आज तो जी भर नाच ले पागल, कल न जाने रे क्या होये...
दुखभरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे...