Saturday, April 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।

डॉ. लीना राजवाडे

आज आपण बघणार आहोत,

  • नेमके खायचे कशासाठी?
  • अन्नपचन म्हणजे नेमके काय?
  • अन्न खाताना कोणत्या नियमांचा विचार महत्त्वाचा आहे.

तच्च नित्यं प्रयुञ्जीत स्वास्थ्यं येनानुवर्तते। माणसाचा जीव, शक्ती, आरोग्य, आयुष्य या सर्व गोष्टी त्याच्या पचनशक्तीत सामावलेल्या आहेत. (जर पचनशक्ती चांगली, तरच या सगळ्या गोष्टी चांगल्या). शरीराला ऊर्जा देणारे, चांगले खाण्या-पिण्याचे पदार्थ घेतले, तर पचनशक्ती चांगली राहते. अन्यथा नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही continuous, ongoing process आहे. तेव्हा साहजिकच त्यासाठी रोज प्रयत्नशील राहायला हवे. उदरभरण हे करायलाच हवे म्हणून करायचे नाही. मला मी जे खातो आहे ते भूक लागल्यावर, शरीराची मागणी आहे म्हणून मी खातो का? हेदेखील बघायला हवे. नव्हे किंबहुना तसे बघण्याची सवय लावून घ्यायला हवी.

  • भूक लागणे ही शरीराकडून नैसर्गिक निर्माण होणारी जाणीव आहे. योग्य वेळी सकाळी उठणे, रात्री वेळेवर झोपणे, रोज ठरावीक व्यायाम करायची सवय ठेवणे, एवढ्या नियमित दिनक्रमाने देखील योग्य वेळेला ही भुकेची जाणीव होते आणि मग त्या वेळी खाल्लेले अन्न तृप्ती देते.
  • भूक लागलेली असताना मात्र जर अन्न खाल्ले नाही, तर अंग मोडून आल्यासारखे वाटते, डोळ्यांवर झापड असल्यासारखे वाटते, अंग दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते. याचबरोबर भूक लागून गेल्यावर, खूप वेळाने जर अन्न खाल्ले, तर ते अन्न कष्टाने पचते. कारण पोटात साठलेला वात अग्नीला (जठराग्निला) मारतो. म्हणजेच पचनशक्ती नीट काम करत नाही. त्यामुळे वेळ होऊन गेल्यावर जे आपण खातो, ती खरी भूक लागून खाण्याची इच्छा नसते, तर जि‍भेचे चोचले पुरवले जाण्याची क्रिया आपण करतो. वारंवार जर हे घडत राहिले, तर पुढे पचनाशी संबंधित पोटाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता वाढू शकते.
  • आज-काल गतिमान जीवनशैलीत अम्लपित्त, उलट्या होणे, पोट जड वाटणे किंवा पोटात गुबारा धरणे या लक्षणांची जंत्री वाढतानाच दिसते. यासाठी वर सांगितलेल्यातील गोष्टी तर आहेतच. पण त्याचबरोबर महत्त्वाचे कारण आहे, भराभर होणारे शारीरिक श्रम, हालचाली. यामुळे काय होते, तर शरीर अधिक श्रमामुळे जसे थकते, ताकद कमी होते, तशीच जठराग्निची ताकद कमी होते, पाचकस्त्राव देखील क्षीण होतात. खूप काळ हे घडत राहिले, तर पोटात गोळा येणे, उलट्या होणे एवढेच नाही, तर आवाजदेखील बसतो, बोलण्याची शक्ती कमी होते. रात्री जागरण करणे आणि दिवसा झोपणे, असे केल्याने योग्य वेळी पथ्यकर, तब्येतीला चांगले अन्न खाल्ले तरीही ते पचत नाही, अजीर्ण होते. यासाठी भूक वेळेवर लागूनच अन्न खायची सवय लावून घ्यावी, हे उत्तम होय. अन्यथा, खाण्याचे हे सहज सोपे नियम न पाळता, अवेळी किंवा केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी हावरटासारखे अन्न खाल्ले, तर पचनाच्या तक्रारींची जंत्री वाढत जाईल, औषध हेच अन्न होईल. अनारोग्यपूर्ण आयुष्य होईल. तेव्हा आपण वेळीच आरोग्यपूर्ण जीवनासाठी सकारात्मक गुंतवणूक करूयात. निरोगी आयुष्याची गुढीच हाती घेऊयात.
  • आजच्या काळात मधुमेह रक्तदाब असे आजार Lifestyle Disorders म्हणून ओळखले जात आहेत. आपण फक्त साखर नियंत्रणात राहावी, रक्तदाब नियंत्रणात राहावा, यासाठी औषधही डॉक्टरांना दाखवून घेतो आहोत. एवढेच नव्हे तर ती औषधे तहहयात घेण्याची मानसिकता बनवत आहोत; परंतु हे सगळे आपण खातो त्या अन्नातून तयार होणारे घटक आहेत. या विचाराकडे दुर्लक्ष करतो आहोत. मी सगळे विविध प्रकारचे अन्न खाईन, अशा गैरसमजुतीमध्ये राहतो आहोत. औषध वेळेवर घेतले पाहिजे म्हणून नाश्ता आणि इतर वेळेला आपण खातो आहोत. अन्नाबरोबर औषधे पचवायला शरीराची ताकद खर्च होत असते. त्यामुळे किमान ही गोष्ट लक्षात ठेवून औषधे घेत असताना क्रमाने, मानवेल असा हलका पोषणमूल्ययुक्त आहार घ्यावा. तरच शरीराचे पोषण योग्य प्रमाणात होईल.
  • आपण खातो त्या अन्नाचा आणि त्यावेळी आपली मानसिकता याचाही संबंध असतो. सतत काळजी करणे, चिंतातुर असणे, दिशाहीन विचारांनी भटकणे, यामुळेही अजीर्ण होते. अन्नाला गोडी लागत नाही. अन्न नकोसे होते म्हणून वाईट मनाने, दुसऱ्याविषयी द्वेष करणारे विचार मनात न आणता आनंदी मनाने अन्न खावे. अन्नालाही कधीही नावे ठेवू नयेत. चांगल्या वासाचे, रंगाचे, छान वाढलेले अन्न ज्ञानेंद्रियांचेही पोषण करते. म्हणूनच मी मागील एका लेखातही लिहिले होते. स्वत:ला मानवेल, सोसवेल असे अन्न मी माझ्यासाठी हे खातो आहे, अशा भावनेने मन त्यात एकाग्र करून खावे.

आत्मानं अभिसमीक्ष्य तन्मना भुञ्जीत।

  • वर दिलेल्या शीर्षकाचा थोडक्यात अर्थ एव्हाना लक्षात आला असेल. अन्न बनवणे, अन्न ग्रहण करणे, अन्नाचे पचन होणे या सर्व गोष्टींना विशिष्ट पद्धत आहे. यज्ञातील अग्नी जसा समिधा, इतर अग्निसंधुक्षण करणारी द्रव्ये आहुतीत प्रमाणात घातली, तर योग्य प्रकाराने पेटलेला राहतो तसेच आपल्या अन्नाचे पचन करणाऱ्या जठराग्निचेही आहे. अन्नरूपी आहुती योग्य नियम पाळून जर त्याला दिली, तर तो अन्नपचन उत्तम करून शरीराचा व्यापार योग्य प्रकारे चालू ठेवू शकतो.

पुढील लेखात जाणून घेऊ आणखी काही आहार विशेष…

आजची गुरुकिल्ली

“बलं आरोग्यं आयुच प्राणाश्च अग्नौ प्रतिष्ठिता।”

(पचन शक्तीवरच शरीराला मिळणारी ताकद, आरोग्य, निरोगी आयुष्य या गोष्टी अवलंबून असतात.)

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -