डॉ. स्वप्नजा मोहिते
पाऊस… तो पडतो रिमझिमत… माझ्या मनातून मोरपिसारा फुलवत झाडा-झाडांतून पावसाचे मोती पेरत तो उमटवत जातो ठसे माझ्या अंगणात!
तो टपटपतो माझ्या कौलांवर. ओघळतो काचेच्या तावदानांवरून आणि रस्त्यावरच्या दिव्यांखालच्या इवल्या तळ्यात प्रकाशाची बेटं सांभाळत तो बरसतो अलवार, माझ्या मनातून अविरत… अनाहत… मलाच भिजवत!! माझ्या मनातला पाऊस!! त्याची मी वाट पाहत असते… अगदी चातक पक्ष्यागत! तो येणार याची वर्दी घेऊन येणारा वारा, माझ्या अंगणात पिंगा घालायला लागतो आणि झाडा-माडांचे शेंडे झुलत राहतात आपल्याच तालात!
समुद्रावर काळे कबरे ढग पांघरतात झालर तेव्हा! दुरातून कुठून तरी ओल्या मातीचा जीवघेणा गंध माझ्याभोवती रुंजी घालू लागतो. दूर घनात पडघम घुमतात आणि टिपरीचा ताल धरत, पावसाचा पहिला हळवा थेंब माझ्या अंगणात उतरतो. तेव्हा तो तळव्यावर झेलायची माझी कोण धावपळ! तो इवलासा थेंब त्याच्या सोबत्यांना घेऊन येतो आणि मोरपिसाचे ठसे माझ्या सारवलेल्या अंगणात उमटतात. मृद्गंधाची झुळूक अलवारपणे खिडकीतून घरात शिरते आणि साऱ्या घरभर फिरून येते.
मला वेढून टाकत ती माझ्याभोवती फेर धरते आणि मी त्या गंधात बुडून जाते… मग मीच त्या पावसाची, पाऊसमयी होऊन जाते.
पाऊस मला भेटला पहिल्यांदा तो ‘ये रे ये रे पावसा’च्या शब्दांतून. नकळत्या वयात पावसात भिजायला शिकले आणि मग हे वेड तना-मनात झिरपतच गेलं. मन मग नकळत पावसाची वाट बघायला शिकलं. भर पावसात पागोळ्यांखाली उभं राहायचं आणि तळव्यावर इवलंसं तळं गोळा करत राहायचं.
घरच्यांची नजर चुकवून भर पावसात फिरून यायचं आणि आजीचे धपाटे खात, तिच्याच कुशीत शिरायचं. ‘काय चक्रम कार्टी आहे! पावसाचं कसलं हे वेड?’ असं कौतुकमिश्रित रागानं तिनं म्हणावं आणि मस्त आलं, गवती चहा घातलेला वाफाळता घट्ट दुधाचा चहा माझ्यासाठी बनवावा, हे तर दर पावसाळ्यात ठरलेलं! आजीच्या धुवट सुती पदराची चादर पांघरून, मी मग कितीतरी वेळ कौलांवर वाजणारा पाऊस ऐकत बसायचे! सर्द अंधाराला तेव्हा देवघरातल्या उदबत्तीचा आणि कापराचा गंध यायचा. आजही ओला अंधार भरास आला की, मला तोच परिचित गंध जाणवतो. देवघरातले देव तेव्हा समईच्या प्रकाशात किती उजळून उठायचे! कौलावरची पावसाची टिपटिप… त्याला सोबत करणाऱ्या रातकिड्यांचं एकसुरातलं गाणं… आजूबाजूला गच्चं दाटून आलेला अंधार आणि त्या काळ्या कॅनव्हासवर चमकून उठणारे असंख्य काजवे… प्रकाशाच्या रेघोट्या मारत फिरणारे! या चित्राचं गारुड अजून उतरत नाहीये मनावरून! प्रकाशाचे फराटे मारत, काजवे उडत उडत माझ्या घरात शिरत आणि असंख्य चांदण्या घरभर पसरत. अजूनही तो पाऊस आठवतो… अजूनही तो ओला अंधार दाटून येतो आणि आजीच्या साडीचा गंध पावसाच्या गंधात मिसळून, सभोवताली रुणझुणत राहतो. लहानपणीच हा पाऊस माझा गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्यामधला सवंगडी होता.
चिखलात ठिक्कर बिल्ला खेळताना, त्या चौकोनात घर बांधून देणारा सखा होता… डबक्यात साठलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडत बसताना, सोबत करणारा मित्र होता! पाऊस तेव्हा गोधडीत गुरफटून मिटल्या डोळ्यांनी, त्याला अनुभवायला शिकवायचा. तेव्हा तो कोवळ्या स्पर्शानं भेटायचा… मनात उतरत जायचा! शाळेत जाता-येताना त्याची माझी गट्टी असायची. मित्र-मैत्रिणींबरोबर कट्टी-बट्टी करणारी मी… पावसाशी मात्र नेहमीच बट्टी असायची माझी!
पावसाचा हात धरून मी कॉलेजच्या रस्त्यावर पोहोचले. चिंब भिजलेला रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला गच्चं फुललेले गुलमोहर! व्हॉट अ साईट! पहिल्या पहिल्या पावसात गुलमोहोर फुलून बहरलेला आणि त्याच्या पाकळ्यांनी पायाशी मस्त पायघड्या घातलेल्या… लालचुटूक रंगाचे ठसे उमटवत, गुलमोहोर गुलाल उधळत होता आणि मी भान हरपून त्या गुलमोहराखाली बसलेले… भिजत! त्या काळ्या डांबरी रस्त्याला किती सुंदर झालर लावली होती त्या पाकळ्यांनी! या वेड्या रस्त्यावरून मनमुराद भटकायचे मी! झाडाच्या पानापानांत लगडलेले पावसाचे मोती, वारा आला की काचेरी लोलकांगत किणकिणत, बरसायचे आणि त्यात भिजत, मी फिरत राहायचे! हातातलं भाजलेलं, तिखट मीठ लावलेलं कणीस आणखीच मस्त लागायचं तेव्हा! या रस्त्यानं मला पावसात भिजणारा समुद्र दाखवला आणि मन त्या उधाणत्या लाटांत कधी गुंतलं, कळलंच नाही. पायाखाली मऊ, सोनेरी वाळू आणि डोक्यावर बरसते नभ! तासन् तास मी या किनाऱ्यावर भटकत राहायचे! समुद्राच्या क्षितिजावरून पखाली भरून, ढग किनाऱ्याच्या दिशेनं सरकत, सरींचे सडे शिंपत, माझ्यावर बरसत राहायचे! त्या उनाड दिवसात पाऊस माझा सहेला होता. त्या निळसर काळोखात तो कृष्णाची निळाई पांघरून यायचा. दूर कुठेतरी अलवार बासरीचे सूर घुमत राहायचे!
त्या हळव्या ओल्या पावसाला तेव्हा कदंब फुलाचा गंध असायचा. मनातल्या किती गोष्टी मी सांगत राहायचे तेव्हा या पावसाला! तोही ऐकायचा माझं… भिजवायचा मला… कधी माझ्या आसवांना सोबत करायचा, तर कधी माझ्या ओठांवर हास्याची फुलं ठेवून जायचा! पापणीवर आसू बनून थरथरत राहायचा कधी, तर कधी झिम्माड बरसत, मला जोजवत शांतवत राहायचा! त्याचं आणि माझं कुठलं मैत्र जुळलं होत, कोण जाणे! रोज माझं भिजून जाणं आणि रोज त्याचं, त्याच आवेगानं बरसात राहणं! कसलं हे वेड?
त्याच आवेगाने पाऊस मला आजही भेटतो! आजही झाडाच्या पानापानांतून पाऊसमणी जडवले जातात.
जेव्हा आभाळ येतं चिंब भरून आणि निळ्या सावळ्या ढगांतून थेंब येतात दाटून… तेव्हा मी भेटते त्याला झाडांखाली… चिंब भिजल्या रस्त्यावर… स्वतःतच गुमसूम झालेल्या लाल मातीच्या पायवाटेवर… चिंब भिजल्या प्राजक्ताच्या केशरी पांढऱ्या फुलांसोबत… हिरव्याकंच माळरानावर झुलणाऱ्या नाजुकशा गवतफुलांना सोबत घेत…
मी आजही भेटत राहते त्याला!
तो येतोच कसा आवेगानं
चिंब देहाच्या कपूर वेलीला भिजवत…
तो गात राहतो त्याचंच गीत
मी मिटल्या डोळ्यानं ऐकत राहते
त्याची स्पर्श-धून!
तो उमटतो मातीतून
फुलत जातो इवल्या हळव्या कोंबासोबत
तो जातो रुजत…
मातीतून… माझ्यातून!!!