अनघा निकम-मगदूम
मोसमी वाऱ्यांनी केरळच्या सीमेवरून भारतात आणि कोकणच्या सीमेवरून महाराष्ट्रात प्रवेश करून आठवडा उलटला आहे. या वाऱ्यासोबत पावसाचे ढग नसल्याने म्हणावा तसा अपेक्षित पाऊस राज्यात पडलेला नाही. त्यामुळे कोकणातील पेरणीची कामे खोळंबली आहेत. पावसाने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडून टाकले आहे. अन्यथा, तो शहाण्या विद्यार्थ्यांसारखा वागला असता, तर पावसाच्या रिमझिमत्या सरीसोबत कोकणातील दळ्यांमध्ये आतापर्यंत पेरणीची कामे आटपत आली असती.
कोकण त्यातही तळकोकण म्हटले की, इथले मासे आणि इथला हापूस आंबा हीच ओळख सर्वदूर पसरली आहे. पण मे महिन्याच्या शेवटी आंब्याची शेवटची पेटी गेली की, इथला शेतकरी शेतीच्या कामांमध्ये रमून जातो. केरळातून गोव्याला ओलांडून महाराष्ट्रात सर्वात प्रथम सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये पावसाची वर्दी लागत असल्याने जूनचा पहिला आठवडा हा शेतीच्या कामाच्या लगबगीचा आठवडा असतो. साधारण ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाऊस ७ ते १० जूनपर्यंत कोकणात पोहोचतो. धडामधुडूमपासून रिमझिमत्या सरींसह सगळे प्रकार दाखवायला सुरुवात करतो आणि इथला शेतकरी पेरणीसाठी सज्ज होतो.
कोकणात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. केवळ रत्नागिरी जिल्ह्याचाच तरीही इथल्या साधारण ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. कोरोना काळात मुंबईचा चाकरमानी गावी परतला होता. या कालावधीत या क्षेत्रात साधारण ३ हजार हेक्टर वाढ झालेली दिसून आली होती. गत वर्षी ७० हजार हेक्टरवर भातशेती करण्यात आली होती. हे चित्र काहीसं आशादायी होतं. पण तरीही तळकोकण हे भात पिकासाठी प्रसिद्ध नाही हीसुद्धा वस्तुस्थिती आहेच.
याला कारण म्हणजे इथला शेतकरी व्यावसायिक नाही. घरामागे पिढ्यानपिढ्या मिळालेली, कसलेली जमीन असते. त्यात आपल्याला वर्षभर मिळेल इतकं बियाणं पेरायचं. पावसासोबत लावणी करायची. श्रावणात विविध देवळात होणाऱ्या सप्ताहात काही काळ रंगून जायचे, भाद्रपदात गणपतीचे जल्लोषात स्वागत करायचे आणि मग दसऱ्यापर्यंत उभ्या राहिलेल्या भात पिकाचे धान्य वर्षाची बेगमी म्हणून घरात साठवून ठेवायचे. तोपर्यंत दिवाळी सरते आणि आंब्याचा मोहोरांचा घमघमाट सुटायला सुरुवात होते. याच वेळी किनारपट्टीवर मासेमारीलाही सुरुवात झालेली असते. त्यामुळे पुढच्या मे महिन्यापर्यंत आपल्या किंवा दुसऱ्याच्या बागेत राबायचे, हेच इथले जीवनचक्र आहे.
म्हणूनच मासेमारी आणि बागायती ही कोकणाची ओळख झाली आहे. शासनानेही बागायतीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केल्याने आणि हे नगदी आणि कमी कष्टाचे पीक असल्याने असेल कदाचित. फळ बागायतीकडे कोकणातील लोकांचा कल अधिक आहे, असे दिसून येऊ लागले आहे. पण याच सगळ्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगाव येथे १०० वर्षे जुने भात संशोधन केंद्र आहे, तिथे वेगवेगळे प्रयोग सतत सुरू असतात. दापोली तालुक्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठसुद्धा याच जिल्ह्यात आहे. असे असतानाही कृषी क्षेत्राकडे इथल्या माणसांचा कल कमी आहे.
कोरोना काळात गावात परतलेल्या चाकरमान्यांनी प्रयोग म्हणून लॉकडाऊनमध्ये भातशेती केली. त्यातून एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले, पण ते कायम राहिले नाही. कोरोना सारायला लागला तसा चाकरमान्यांची पावले पुन्हा कामाच्या ठिकाणी परतली आहेत. दोन वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा आली आहे. यंदा आतापर्यंत केवळ ४० टक्के बियाणांची विक्री झाल्याने कृषी तज्ज्ञांनी काढलेला हा निष्कर्ष आहे; परंतु आंबा असो किंवा मासेमारी असो हमखास आर्थिक उत्पन्न देणारे हे स्त्रोत थेट हवामानावर अवलंबून आहे. अशा वेळी दुसरा पर्याय निर्माण करणे आवश्यक आहेच; परंतु फळ बागायती ही इथे मूठभर लोकांच्या हातात आहे. उर्वरित कष्टकरी हे कसण्यासाठी तिथे जात असतात, तर मासेमारीमध्येसुद्धा हीच स्थिती आहे. अशा वेळी इथल्या शेतीमध्ये नवनवे प्रयोग झाले, तर इथला कोकणी माणूस आर्थिक स्वावलंबी होण्यास थोडा फार उपयोग नक्की होणार आहे. अन्यथा, दुसरा पर्याय म्हणून मुंबई, पुणे इथे नोकरी याकडेच पहिले जाते.
खरं तर जे आहे त्याकडे थोडं अधिक लक्ष दिलं, तर जगणं सुसह्य होऊच शकतं. त्यातही कष्ट कुठेही टळलेले नाहीत, अशा वेळी इथला तरुण अगदी महिलासुद्धा शेतीकडे वळल्या, तर नवी क्रांती इथे घडू शकते. केवळ खरिपातच तर दुबार पीक पद्धती इथे राबवता येऊ शकते. कोकणात छोटे-छोटे दळे अर्थात छोट्या आकाराची शेती आहे. अशा वेळी सामूहिक शेती यशस्वी होऊ शकते. सोबतीला भात संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ आहेच. गरज फक्त मानसिकता बदलण्याची आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी बदल झाले पाहिजेत, तरच इथल्या शिवाराला शेतीतून झळाळी येईल आणि केवळ आंबा, माशांसाठीच नव्हे, तर भातशेतीसह विविध पिकांसाठी ही भूमी नव्याने ओळखली जाईल.