डॉ. वीणा सानेकर
मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ साली झाली, पण विद्यापीठात मराठी विभाग स्थापन होण्यास मात्र १९६९ साल उजाडावे लागले. म्हणजे महाराष्ट्रातच मराठी विभाग स्थापन होण्यास एका शतकापेक्षा जास्त काळ जावा लागला. त्या आधी इंग्रजी, संस्कृत, जर्मन, रशियन हे विभाग स्थापन झाले. हे कळले तेव्हा आश्चर्य वाटले.
कालसुसंगत अभ्यासक्रम ही कोणत्याही अभ्यासक्रमांची गरज असते. काळाबरोबर बदलता आले नाही, तर बंदिस्त चौकटीत जखडून पडण्याची वेळ येते. हे जखडणे व्यक्तीच्या विकासाला मारक असते, तसे ते समाजाच्या किंवा भाषेच्या विकासालाही मारक असते.
उच्च शिक्षणातील मराठीचेही असेच झाले. इंग्रजीसारख्या विभागांचे विस्तारीकरण झाले. पण मराठीचे विभाग वर्षांनुवर्षे साहित्यकेंद्री राहिले. ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’सारखा अभ्यासक्रम सुरू झाल्यावर वाहिन्यांच्या जगातील प्रसारमाध्यमांतील अनेक संधी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या. त्या मानाने मराठीतील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले किती विद्यार्थी या क्षेत्राकडे वळले?
मराठी विषयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बरेच विद्यार्थी पूर्वी शिक्षकी पेशाकडे वळायचे. पण मराठी शाळांची पटसंख्या कमी होणे, महाविद्यालयांतल्या मराठी विभागांमधील
संधींचा संकोच या सर्वांतून इथेही रोजगार कमी होत गेले. मराठी विषयाच्या निवडीवर विश्वास ठेवायचा, तर विद्यार्थ्यांना नोकरीच्या नवनवीन शक्यता सापडायला हव्यात. पण तसे चित्र उभे राहिले नाही.
मराठी साहित्याचा अभ्यास करून पीएचडी पदवी मिळवलेले अनेक विद्यार्थी नोकरीतील उत्तम संधीची वाट पाहत आहेत. मराठीचा अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या नवनवीन शक्यता यांची सांगड घातली जाणे आवश्यक होते. पण ते काळाच्या ओघात घडले नाही. विद्यापीठे व महाविद्यालयांमधील मराठी विषयांचे अभ्यासक्रम पारंपरिकच राहिले. साहित्याबरोबरच मराठीच्या उपयोजित अंगाचा विचार झाला नाही.
साधारणपणे २००९ साली मराठी अभ्यास केंद्राने मुंबई विद्यापीठात एका परिषदेचे आयोजन केले होते. मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये कालानुरूप बदल झाले पाहिजेत व त्याकरिता मराठी विभागांचे विस्तारीकरण झाले पाहिजे, हे या परिषदेचे मुख्य सूत्र होते. नव्या – जुन्या पिढीचे जवळपास नव्वद प्राध्यापक या परिषदेला उपस्थित होते. नव्या पिढीच्या प्राध्यापकांनी बदलाच्या प्रस्तावाचे स्वागत केले.
मराठी अभ्यासकेंद्राने विविध विद्यापीठांकडे प्रस्तावाचा पाठपुरावा केला. या सर्व पार्श्वभूमीसह मराठी अभ्यासकेंद्राने डॉ. प्रकाश परब लिखित ‘मराठीच्या उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा’ ही पुस्तिका प्रकाशित केली. दहा-बारा विषयांपूर्वी प्रकाशित झालेली ही पुस्तिका आजही तितकीच महत्त्वाची आहे. या पुस्तिकेत त्यांनी विविध राज्यांतील भाषेची विद्यापीठे व विदेशातील भाषेच्या विद्यापीठांतील अभ्यासक्रमांची उदाहरणे दिली आहेत.
आज अनेक मराठी विभागांतील प्राध्यापकांसमोर विद्यार्थ्यांना मराठीकडे वळवण्याचे आव्हान आहे. मराठी वाङ्मय मंडळांनी आमूलाग्र कात टाकण्याची गरज आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांनी मराठीच्या कार्यक्रमांकरिता चांगला निधी उपलब्ध करून दिला, तर मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांच्या माध्यमातून चांगल्या कार्यक्रमांची निर्मिती करता येईल. एका बाजूने अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांना मराठीकडे वळवणे व दुसऱ्या बाजूने मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल घडवणे, अशा
दिशेने मराठीच्या संवर्धनाचा मार्ग सुकर होईल. त्याकरिता अनुवाद, सर्जनशील लेखन, जाहिरात लेखन, संगणकीय, मराठी भाषेचे अध्यापन, ग्रंथनिर्मिती, प्रकाशन व्यवहार, लोकसाहित्य, नाट्य व चित्रपट समीक्षा असे अनेक विषय मराठीच्या उच्च शिक्षणात समाविष्ट व्हायला हवेत.