सतीश पाटणकर
पावसाळा सुरू झाला की, रात्रीच्या वेळी ‘कुर्ल्यो पकडूक जाणे’ हा कोकणी माणसाचा उपक्रम. रात्रीच्या अंधारात मस्त भरलेले खेकडे पकडून आणायचे. त्याचे कालवण मटणापेक्षा भारी लागते. आजकाल हे खेकडे बाजारातसुद्धा विकत मिळतात; परंतु स्वतः कुर्ले पकडायला जाण्याचा आनंद काही वेगळाच. पावसाळा सुरू झाल्यावर मासेमारी बंद झाल्याने गोलमो, सुके बांगडे यावर नॉनव्हेज जेवणावर भागवावे लागते. घराच्या शेजारी अंगणात उगवणारी टाकळ्याची (टायकाळो) ही फुकट उपलब्ध होणारी भाजी हीची चव.
‘वेंगुर्ल्याचा पाऊस’ या कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रसिद्ध कवितेत वेंगुर्ल्याच्या पावसाचे यथार्थ वर्णन आहे. कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म वेंगुर्ल्याचा. उभादांडा येथे समुद्र किनाऱ्यावर त्यांचे घर. कवी पाडगावंकरांचे वेंगुर्ल्यातील वास्तव्य १० वर्षे होते. वेंगुर्ल्यासारख्या निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेल्यामुळे ‘वेंगुर्ल्याचा पाऊस’ ही अतिशय सुंदर कविता त्यांना सुचली. १० मार्च २०१५ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी कवी मंगेश पाडगावकर यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात वेंगुर्ल्याच्या पावसाच्या आठवणी जागविल्या आहेत. ही कविता ऐकताना, वाचताना आपणाला पावसात चिंब भिजल्याचा प्रत्यय येतो. पावसाळ्यात खेकड्याचा रसभरीत रस्सा, कुणाला आवडणार नाही! पावसाळा आला की, मासे बाजारात कुर्ल्या जास्त प्रमाणात दिसू लागतात. तेव्हा कुर्ल्या नाही खाल्ल्या, तर नवलच…
पावसाळ्यात कुर्ल्याचे कालवण आणि गरम गरम भात… यासारखे स्वर्गीय आनंद देणारे खवय्यांसाठी दुसरे काहीच नसेल… कुर्ल्या अमावस्येच्या वेळी घ्याव्यात, त्या भरलेल्या असतात. त्या नेहमीच जिवंत घ्याव्यात. मादी व नर कुर्ल्या कशा ओळखाव्यात, तर जेव्हा कुर्ल्या नर असतात, तेव्हा त्यांचे डेंगे मोठे असतात व मधला पाठीचा भाग छोटा असतो. त्याच्या विरोधात मादीचे असतात तिचे डेंगे लहान असतात आणि पाठीचा भाग मोठा असतो. कुर्ल्या नेहमी काळ्या पाठीच्याच घ्याव्यात, घेण्याआधी त्या दोरीने उचलून बघाव्यात, जड असल्यास घ्याव्यात, शक्यतो मादी घ्यावी, तिच्यात अंडी असतात यामुळे ती जडही असते (भरलेली असते). कोकणात लोकं रात्री खेकडे पकडण्यासाठी जागतात. खेकड्याचे कालवण, नाग्यांचा रस्सा अगदी भारी! खेकडे पकडण्याची काही विशेष पद्धत आहे.
पाठीवर झपकन दाब दिल्यावर खेकड्यावर ताण पडतो. तुम्हाला माहीत आहे का? कोल्हा शेपूट बिळात घालतो, ते शेपूट खेकड्याने धरल्यावर तातडीने तो बाहेर काढून दगडावर मारतो. कोल्ह्याची ही नामी युक्ती नक्की कधीतरी पाहा.
पावसाळा सुरू झाला की, कुर्ल्यांचं म्हणजे खेकड्यांचं पीकच येतं. मग मटणाप्रमाणेच कुर्ल्यांचेही बेत शिजू लागतात. चवीत मटणाच्या रश्श्यालाही मागे टाकणाऱ्या कुर्ल्यांची जिभेवर रेंगाळणारी झणझणीत चव…. गावोगावी पाऊस आता रुळलाय. नद्या, नाले, ओढे, पऱ्हे दुथडी भरून वाहू लागलेत. एवढे की, नाल्या-ओढ्याचं पाणी आता शेतातही खेळू लागलंय आणि म्हणूनच एरव्ही समुद्राच्या खाडीच्या खाजणात आढळणारी किरवी म्हणजेच कुर्ल्या वाहत्या पाण्याबरोबर नदीतून नाल्यात आणि नाल्यातून शेतात धावू लागल्या आहेत.
साहजिकच सांजच्याला काही कोरड्यास नसलं की, घरातली सासुरवाशीण शेतावरनं येतानाच कारभाऱ्याला ‘येताना थोड्या कुर्ल्या घेऊन या’, म्हणून सांगू लागली आहे.
कुर्ल्यांचा बेत ठरला की, माणूस एकटा-दुकटा नाहीच जात कुर्ल्यां पकडायला. कारण तुरूतुरू धावणारी छोट्या-मोठ्या कुर्ल्या शेतात सहज सापडत असल्या, तरी भरपूर मांस असलेली किरवी हवी असतील, तर नदीत किंवा नाल्यातच उतरावं लागतं आणि कुर्ल्यांची बिळं हुडकावी लागतात. नेहमीच ही बिळं कुर्ल्यांची नसतात, कधी कधी पाणसापांचीही असतात. पण जे पट्टीचे मासेमार असतात, त्यांना कुठली बिळं कुणाची ते बरोब्बर ठाऊक असतं आणि किरव्यांचं बीळ हुडकलं की, ते लगेच त्या बिळात हात घालत नाहीत. खेकड्यांना पकडताना ते आपल्याबरोबर गवताची काडी ठेवतात. किरव्याचं बीळ दिसलं की, त्यात ते हळूहळू गवताची काडी घालतात. काडी पुरेशी आत गेल्यावर ते काडी भोसकायला सुरुवात करतात. जर आत किरवा असेल, तर तो त्या भोसकण्याने चिडून ती काडी आपल्या आंगड्यांमध्ये (नांग्या) घट्ट पकडतो. त्यासरशी काडी आत सारणाऱ्याला काडी जड लागते आणि किरवा फसल्याची खात्री पटते. मग तो ती काडी अलगद बाहेर काढतो. त्याबरोबर कुर्ल्याही बाहेर येतो. मात्र सहज हातात सापडलेला हा किरवा खूप सावधपणे पकडावा लागतो. त्याला बेसावधपणे पकडायला गेलं, तर त्याने हाताचा अंगठा आपल्या आंगड्यांनी फोडलाच म्हणून समजा. म्हणूनच किरवा पकडताना तो मागून त्याच्या मधल्या भागावर दाब देऊनच पकडावा आणि पकडल्या पकडल्या त्याच्या आंगड्या तोडाव्या. असे आंगड्या तोडलेले मोठ्ठाले किरवे टोपलीभर जमा झाले की, सारेजण त्याची वाटणी करतात आणि ऐटीत घरी जातात. एव्हाना त्यांच्या जिभेवर कुर्ल्याची चव रेंगाळायला सुरुवात झालेली असते. अर्थात किरवी पकडून यजमान घरी परतेपर्यंत, सासुरवाशिणीने वाटणाघाटणाची सगळी तयारी करून ठेवलेली असते. कांदा-खोबरं चुलीत खमंग भाजून वाटून ठेवलेलं असतं. आलं-लसणाची बारीक गोळी वाटून ठेवलेली असते. फोडणीसाठी कांदाही बारीक चिरून ठेवलेला असतो. घरी येऊन यजमानाने कुर्ल्याची पोतडी हातात सोपवली की, पुढची उस्तवार तीच करते. सगळ्यात आधी ती किरवी पाण्याने स्वच्छ धुऊन घेते. नंतर त्यांचे पाय तोडून ते पाट्यावर जाडसर वाटते आणि पाण्यात टाकून पायातलं मांस आणि कवच वेगळं करते. मग कवचाचा जाडसर भाग टाकून, मांसयुक्त पाणी कालवणासाठी ठेवून देते.
कुर्ल्या साफ करणं तसं जिकिरीचंच असतं. आंगड्या मोडलेल्या असतात. पायही मोडून झालेले असतात. किरव्याचा मधला जो भाग असतो, त्याला पेंदा म्हणतात. तो मांसाने भरलेला असतो. तो साफ करताना त्याचं वरचं कवच काढून टाकलं जातं. मात्र कवच साफ करताना त्यात जी लाख असते, ती काढून घेतात. किरवी छोटी असतील, तर ती क्वचित कवचासकट ठेवतात आणि जर मोठी असतील, तर त्याचे विळीवर दोन तुकडे करतात. अशा कुर्ल्यावर ते गरमगरम असतानाच ताव मारण्याचा आनंद काही भन्नाटच असतो. सर्दी घालवण्यासाठी किरव्यांचा तिखट जाळ रस्सा हा उत्तम उपाय मानला जातो. असा हा किरवा किंवा कुर्ल्या म्हणजेच खेकडा. संपूर्ण महाराष्ट्रात किरव्यांना सरसकट खेकडा म्हटलं जातं. पण कोकणात खेकड्यांना किरवा, कुर्ल्या, चिंबोऱ्या अशी अनेक नावं आहेत. विशेषत: आगरी-कोळी समाजात खेकड्यांना चिंबोऱ्या म्हणतात आणि त्या अधिक करून हिरव्या मसाल्यात म्हणजे आलं-लसूण-कोथिंबिरीच्या वाटणात केल्या जातात. उर्वरित कोकणात मात्र खेकड्यांना कुर्ल्या किंवा किरवीच म्हटलं जातं आणि मटणासारखंच भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून कुर्ल्या मासाला करण्याची पद्धत आहे. खेकडे महाराष्ट्रात सर्वत्र मिळतात, त्यामुळे ते सगळीकडेच खाल्ले जातात; परंतु कोकणातली मजा इतरत्र नाही. कारण कोकणात पेंदा किंवा आंगड्या दाताने चावूनच खाल्ल्या जातात. हे भरलेले खेकडे खातानाची मजा काही न्यारीच असते. कारण खेकड्यांतलं चविष्ट मांस असतंच. पण जोडीला त्या मांसाची आणि रश्श्याची चव कवचात भरलेल्या सारणातही उतरलेली असते.
खेकडा बहुगुणी आहे. त्याच्यामध्ये उच्च प्रतीच्या प्रोटिन्सचा पुरवठा शरीराला होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते. कर्करोगाचा धोकाही टळतो. शिवाय मांसल भागात कार्बोहायड्रेटस असल्यामुळे मधुमेहींना खेकडा उत्तम. वजन कमी होतेच, पण सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. हे खूप कमीजणांना माहीत आहे. त्यामुळे या पावसाळ्यात खेकड्यांचा झणझणीत रस्सा खायला विसरू नका!