
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्पाईसजेट या विमान वाहतूक कंपनीच्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे बिहार पटणा येथील बिहता विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण १८५ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी विमानातून सुखरूप बाहेर आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
स्पाईस जेटच्या बोईंग ७२७ या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानाला मागील डाव्या बाजूने अचानक आग लागली. ही आग फुलवारी शरीफ या भागातील लोकांनी पाहिली. या लोकांनी विमानाला आग लागल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी तशी माहिती दिली.
विमानामध्ये तांत्रित बिघाड झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती असल्याचेही सिंह यांनी सांगितले. या विमानातील सर्व १८५ प्रवासी सुखरूप आहेत. दिल्ली येथून १२.३० वाजता या विमानाने उड्डाण केले होते. या विमानाला उंची गाठता येत नव्हती. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी हे विमान जवळपास २५ मिनिटे हवेतच होते. विमानाने लँडिंग केल्यानंतर विमानतळाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी विमानाकडे धाव घेतली. तसेच त्यांनी प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.