डॉ. विजया वाड
अजून किती वेळ आहे?” थोड्याशानं मंजूनं विचारलं. आज ती बाबूसोबत होती. स्लममध्ये बाबूचं घर होतं. मंजूला कल्पना होती. बाबू शिपाई होता ना!
“ती समोरची पत्रा चाळ.” बाबूनं बोट केलं.
“चाळ स्वच्छ दिसते!”
“आम्ही आळीपाळीने साफ ठेवतो. डिवटी लावून.”
“डिवटी नव्हे बाबू. ड्यूटी. इट्स ड्यूटी.”
“ड्यूटी.”
“राईट. डी यू टी वाय!”
“डीयूटीवाय. ड्यूटी.”
“बेस्ट बाबू! यू स्पीक गुड इंग्लिश.”
“मंजू, थँक्यू.”
“कशाबद्दल.”
“आज तू घरी येण्याबद्दल. माझ्यासोबत जाहीरपणे येण्याबद्दल. किती तरी गोष्टीसाठी थँक्यू!” बाबूचे तळवे ओल्या डोळ्यांपाशी गेले. ते त्याने दोन्ही हातांच्या बोटांनी न लाजता पुसले. म्हातारी घरी होती. काकू पण होती. झकपक पोशाख केलेली पोरगी घरी आली बघून काकूचं आठ्यांनी भरलंच कपाळ.
“या आमच्या मंजूसाहेब.” बाबू काकूला म्हणाला.
“नमस्ते काकू. नमस्ते आई.” मंजूने म्हटलं.
“नमस्ते… नमस्ते.” बसायला सांगत काकूने म्हटले. आई गप्प गप्प होती.
“मी चाय घेऊन येतो कोपऱ्यावरनं.” बाबू म्हणाला. घरात चहा, साखर सर्व होतं. दूध होतं. गॅस होता. पण काकूला त्रास नको ही त्याची भावना होती. आईला काही करावं लागू नये, अशी बाबूची इच्छा होती. येताना शेव, गाठ्या विकत आणल्या होत्याच. त्या बशीत ओतल्या; बशी मंजूपुढे ठेवून म्हणाला, “घ्या मस्त ताज्या आहेत.”
“हो. हो. घेते नं. बाबू मला शेव, गाठ्या बास्. आता चहा नको.” ती गडबडीने म्हणाली.
“असं कसं” पयल्यांदाच आली होती ना मंजू!
“चाळ स्वच्छ ठेवलीय बाबू.”
“आम्ही ड्युटी वाटून घेतलेली आहे नं मंजूसाहेब.”
“अरे घरी कसलं साहेब-बिहेब? बाबू, तू नुसतं मंजू म्हण.”
“नको नको. मला माझ्या लिमिटमधी ठेवा मंजूसाहेब.” तो मंजूला अजिजीने म्हणाला.
इतका आर्जवाने की ती हसून ‘बरं बरं’ म्हणाली. काकूने नाइलाजास्तव; ग्लूको बिस्कीट नि चहा
केला. बाबूला किती बरं वाटलं म्हणून सांगू? ‘काकू थोर तुझे उपकार’ हे गाणंसुद्धा मनातल्या
मनात गाईलं.
“तुम्ही याच्या साहेब का?”
“हो. हेडक्लार्क आहे मी सेक्शनची. बरेच दिवस बाबू मागे लागला होता ‘या या’ म्हणून शेवटी आज योग आला.”
“हो ना!” काकू स्वरात अगत्य ओतत म्हणाली. ‘हेडक्लार्क’ आल्या होत्या नां! साध्या शिपायाकडे आल्या होत्या त्या!
“आमचा बाबू श्यामळू आहे अगदी” काकू म्हणाली.
“त्याच्या कामात तो आदर्श आहे अगदी” मंजू उत्तरली.
“काय हे मंजूसाहेब?”
“अरे काय हे साहेब साहेब अं?”
मंजूचा रागेजला स्वर ऐकून बाबूने हात जोडले. पुन्हा पुन्हा. क्षमायाचना नजरेनं केली. तिने हातानेच ‘पुरे पुरे’ केले.
मग चहा-बिस्किट मुकाट खाल्ली. काकू खूश झाली.
“छान. आता कसं बरं वाटलं.” आईसुद्धा म्हणाली. तिच्या जावेकडे कृतज्ञभावाने बघून!
“तुम्ही एकत्रच राहता का?” मंजूने विचारलं.
“राहावं लागतं.” बाबूकडे न बघता काकू म्हणाली.
“काय करणार?” “पण पैशे देतो बरं आम्ही खावटी-राव्हटीचे. फुकटचे नाही राहात बरं आम्ही.”
“ते ओघानेच आले हो.” मंजू म्हणाली.
“मी आपलं सांगते.”
“उत्तम. मुंबैत एका खोलीत आठ-दहा लोकं राहतात.”
“अहो ही मुंबै नगरी काय काय दाखवील त्यवढं खरं.” काकू हात ओवाळीत म्हणाली.
“बरं, आता मी निघू का?” मंजूने विचारले. चहापान झाले होते. थांबण्यासारखे काही उरलं नव्हतं.
“कशा जाणार?”
“रिक्षा-बसने… कशीही” मंजूनं म्हटलं.
“बरं. जपून जा.” काकू निरोपाचं म्हणाली.
मंजू निघाली. बाबू सरपटत होताच शेजारी.
“तू कशाला येतो?”
“माझी डिवटी बजावतो.”
“डिवटी नाही ड्युटी!”
सगळी हसली. “बरं ड्युटी. माझी ड्युटी आहे ती. मी बजावतो.”
बाबू बसस्टॉपवर गेलाच. हट्टाने. बेस्टची बस आली. तांबडी. पट्टेरी. पिवळा पट्टा अंगावर मिरवणारी. बाबू पटकन् आत शिरला. मंजूच्या आधी…!
“अरे, तू कशाला?”
“तुम्हाला सोडायला मंजूसाहेब.”
“मी जाईन नं.”
“माझं कर्तव्य बजावतो मंजूसाहेब.”
“पुन्हा साहेब?”
“बरं! मंजूजीss” बाबू संकोचत म्हणाला.
“मंजू”
“नुसतं नाव नको. ‘जी’ जोडतोच.” तो आग्रहाने म्हणाला.
“आपण दोघंच असलो की ‘जी’ वगैरे नको.” तिनं हात उंचावला. बाबूनं आपला गाल पटकन् हात ठेवून प्रोटेक्ट केला. ती हसली. “घाबरलास?”
“थोडासा.”
“खरं तर तुला आवडतं. लाज बीज उगाच.”
“होय मंजूजी. पण लाजायला होतंच. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी.
मंजूजी, तुम्हाला…”
“मला काही संकोच वाटत नाही.” ती बिनधास्त होती.
“पण मला भरपूर संकोच वाटतो.” बाबू प्रामाणिकपणे म्हणाला.
“अरे बाबू, जग फास्ट लोकल झालंय. ज्याला त्याला आपली चिंता. जो तो आपल्या चिंतेत. चिंतेची स्टेशनं असली तरी ती स्वत:पुरती! भागली चिंता? बस् और कुछ नहीं चाहिए! असं सेल्फसेंटर्ड जग! सेल्फसेंटर्डचा अर्थ?”
“स्वत:पुरंत”
“हुशार आहेस.”
“बारावीला साठ टक्के होते मंजूसाहेब.”
“मंजू.”
“बरं मंजूजी.”
“मंजू” तिचा स्वर ठाम होता.
“बरं मंजू.” तो थरथरला. ती मात्र गोड हसली. मधुरसं!
“काळजात लकाकलं.” बाबू म्हणाला.
“पटकन् ग्रॅज्युएशन कर. मी मदत करीन.”
“मंजू, हपिसात काम खूप असतं गं.” बाबू कळवळला.
“अरे आगरकर नावाचे थोर पुढारी होऊन गेले आपल्यात.”
“त्यवढं ठाऊक आहे मला. ते दिव्याखाली, महानगरपालिकेच्या, अभ्यास करायचे.”
“बाबू, त्यांचा आदर्श समोर ठेव.” बस स्टॉप आला. ती नि तो उतरले. “आता? परत मी येते तुला पोहोचवायला.”
“प्रेमाची परतफेड.” मंजू न लाजता म्हणाली.
“नको. तुम्ही मोठ्या साहेब. मी साधा शिपाई.” बाबू नरमून म्हणाला.
“ते ऑफिसात! बाहेरच्या जगात नाही.”
“मंजू.” बाबू भावुक झाला. त्याने तिच्याकडे भावुक नजरेने बघितले. मंजूने त्याचा हात गच्च पकडला.
“डू यू लव्ह मी बाबू?”
“सांग ना! सांग.”
“हे काय भलतंच” एक कोवळा क्षण जन्म घेत होता.
“खरं सांगायची भीती वाटते?”
“खरं. म्हणजे होच. हो. खूप प्रेम करतो मी तुमच्यावर.”
“गच्च गर्दीय बाजूला बाबू.”
“गर्दीतही लाटा वेगळ्या असतात मंजूजी.”
“हो. एका लाटेचा दुसरीशी संबंध नाही.” मंजू म्हणाली.
“माणसांचंही तसंच असतं. आपली गुर्मी. आपली मस्ती. नाही बॉ संबंध; एकमेकांशी गरजेपुरती बांधलेली नवरा-बायको, आई-मुलगा सारेच गरजू. उतार वयात माय गरजू. तरुण वयात बाळ गरजू. केल्या उपकारांचं ऋण फेडत सारे गरजू असहाय्यपणे एकत्र राहातात.”
“साहित्यिक बोललास.”
“खरं ते बोललो.”
इतक्यात जोराचा धक्का बसला. बस कचकन् थांबली. वाहनचालकाने धाडधाड शिव्या दिल्या.
“मरना है क्या? मेरे बसके नीचे मत मर.
म्हातारी साली. मरत नाहीत. जगत राहातात. बसके नीचे मरायला! तडफड तडफड! ड्रायव्हरकी छुट्टी! पुलीस आएगी तो?” ड्रायव्हरची खदखद
बाहेर पडली.
बाबूला काकू आठवली. आई आठवली. दोघी जगत होत्या म्हणून त्याच्या जगण्याला अर्थ होता. पगाराला अर्थ होता. कर्तेपणाचं श्रेय नसलं तरी पगार खावटीला उपयोगी पडतो, हे त्याला पुरत ठाऊक होतं. छबू नि सम्राट मस्तीत जगतात, पण दोन-दोन हजार देतात नि बाकी?
बाकी मस्ती! मौज! छबूच्या नि सम्राटच्या बाबूनं एकेक खाड खाड लगावली. सारे मनोमन. बाबूला मस्त वाटलं.