Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

पायाच्या दुखापतीमुळे अँडरसन कसोटीला मुकला

पायाच्या दुखापतीमुळे अँडरसन कसोटीला मुकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून येत्या २३-२७ जून दरम्यान दोन्ही संघातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून इंग्लंडच्या संघाने २-० ने आघाडी घेतली आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. तो पायाच्या दुखापतीने ग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.

अँडरसनची दुखापत हा इंग्लंड संघासाठीही चिंतेचा विषय आहे. कारण तो या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अँडरसनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले होते. मात्र, त्याने पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. अँडरसनने नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये ६५० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडच्या संघाने २-० ने अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात अँडरसनच्या जागेवर स्टुअर्ट ब्रॉडला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात येत्या २३ जूनपासून सुरुवात होणार आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे.

Comments
Add Comment