प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचे असे काही टप्पे येतात आणि त्यातील पहिला व अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीची (एसएससी) परीक्षा हा होय. या परीक्षेतील यश- अपयशावर किंबहुना त्यात मिळणाऱ्या गुणांच्या टक्केवारीवर पुढील आयुष्याची सर्व गणिते आधारलेली असतात. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा, शिक्षकांचा तसेच शाळांचा संबंधित क्लासेसचा असा सर्वांचाच आटापिटा सुरू असतो. चांगली टक्केवारी प्राप्त झाली तर संबंधित विद्यार्थी आणि त्यांचे पालकही आपल्या पाल्याला विशिष्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात आणि त्या पाल्याला हवे ते शिक्षण देणे त्यांना शक्य होते. इतकेच नव्हे तर पाल्याला आपल्या इच्छेप्रमाणे शिक्षण देऊन (लादून) त्याच्यामार्फत आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा इरादा पालक पूर्ण करून घेतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने दहावीची परीक्षा महत्त्वाची ठरते. अलीकडेच लागलेल्या बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ती प्रतीक्षा शुक्रवारी संपली आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे ९९.२७ टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९८.५० टक्के लागला आहे.
तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे यंदाच्या निकालांमध्येही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९७.९६ टक्के, तर मुलांचा निकाल त्यापेक्षा कमी म्हणजे ९६.०६ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या वर्षीची दहावी परीक्षा १५ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडली होती. यंदा कोरोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा होती. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती व सर्वांना निकालाची प्रतीक्षा होती. सर्वत्र अनिश्चितता आणि कमालीचा तणाव अशा सर्व अनाकलनीय परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची अशी परीक्षा दिली आणि चांगले यशही मिळविले आहे. कारण हा काळच वेगळा होता व त्याबाबत कुणालाच कसला अनुभव नव्हता. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा २२,९२१ शाळांपैकी १२,२१० शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. तसेच यंदा ६८ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २४ विषयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. राज्यात १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वाधिक कमी निकाल हा नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका लागला आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ९४.४० टक्के आहे. या परीक्षेत राज्यातील २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असून ही एक चिंतनीय बाब आहे. राज्यात सकारात्मक शैक्षणिक वातावरण असताना या शाळा अपयशी का ठरल्या याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कला, क्रीडा, एनसीसी आणि स्काऊट-गाईडमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या आणि प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहेत. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धा न झाल्याने या विद्यार्थ्यांनी ते सातवी आणि आठवीत असताना दाखवलेल्या प्रावीण्यानुसार दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारून अधिकचे गुण मिळवण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांना लागोपाठ दोन वेळा होणाऱ्या म्हणजे जुलै-ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ ला होणाऱ्या परीक्षेच्या वेळी पुन्हा परीक्षा देता येणार आहे. विशेष म्हणजे यंदा १२२ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. त्यात पुणे ५, औरंगाबाद १८, मुंबई, कोल्हापूर १८, अमरावती ८, नाशिक १, लातूर ७०, कोकण १ अशा १२२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेत गैरप्रकारही आढळले आहेत. त्यात दुसऱ्याच्या नावावर बसलेला विद्यार्थी १, गैरप्रकार करताना पकडलेले ७९ विद्यार्थी होते. अशा प्रकारांची टक्केवारी आता कमी होत असून ती पूर्णत: संपुष्टात येईल तो सुदीन म्हणावा लागेल.
यंदाची ही परीक्षाही कोरोना महामारीच्या काळात झालेली असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा-महाविद्यालये पूर्णत: बंद होती. नाही म्हणायला विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग भरत असत आणि शिकवणेही त्याच पद्धतीने झाले होते. कोरोना निर्बंध लागू असल्याने बराच काळ या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन झाले असले तरी शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस कोरोना आटोक्यात आल्याने निर्बंध उठविण्यात आल्यामुळे शाळा सुरू झाल्या होत्या. कालांतराने परीक्षाही ऑफलाइन (प्रत्यक्ष) घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कोरोनासारख्या महाभिषण परिस्थितीत ऑनलाइन व नंतर ऑफलाइन अशा अस्थिर परिस्थितीतील शिक्षणामुळे परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आपण विशेष स्वागत करायला हवे. आता दहावीची मुख्य परीक्षा पास झाली असली तरी आयुष्यात यापुढे अनेक परीक्षा त्यांना द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे आता खरी परीक्षा सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही. यापुढील सर्व परीक्षांना आपण सुयश चिंतू या!