Saturday, May 10, 2025

ठाणेमहत्वाची बातमी

अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेची कारवाई

अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेची कारवाई

ठाणे (हिं.स) : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.


या कारवाईतंर्गत ब्रम्हांड सिग्नल येथे फुटपाथवर बांधलेल्या अंदाजे १० X १५ चौ. फुटाचे विटा सिमेंटचे अनधिकृत शौचालयाचे बांधकाम, नागलाबंदर येथील १५ X १५ चौ. फुटाचे विटा सिमेंटचे अनधिकृत १ रुमचे बांधकाम, पानखंडा येथील १० X १५ चौ. फुट अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.


तसेच हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा येथील अनधिकृत गाळयांचे पत्र्याचे शेड निष्कासीत करण्यात आले. कोलशेत रोड येथील राजू पाटील यांचे निवासी व अनिवासी ५० X २० चौ. फुटाचे पक्के बांधकाम निष्कासीत करण्यात आले. ढोकाळी येथील राम यादव यांचे चौथ्या मजल्यावरील आरसीसीचे ८०० चौ. फुटाचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले.


त्याचप्रमाणे मरीआई नगर येथील लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने बांधलेले २० X ३० चौ.फुट व १० x २० चौ. फुटाचे २ भंगारचे अनधिकृत गोडाऊन निष्कासीत करण्यात आले. विहंग हॉटेल शेजारील सर्व्हिस रोड येथील साई प्लाझा सोसायटीचे अनधिकृत आरसीसी गेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडण्यात आले. तर मोहन मिल कंपाऊंड येथील २ पडीक पक्की बैठी व १ अतिधोकादायक बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले.


सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त परिमंडळ -३ दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, वर्तकनगर, लोकमान्य सावरकर नगर, उथळसर प्रभाग समितीचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली.

Comments
Add Comment