Thursday, July 18, 2024
Homeदेशसाध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

इकबाल कासकरच्या नावाने फोनवर दिली धमकी

भोपाळ (हिं.स.) : मध्यप्रदेशातील भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना फोनवर ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने आपण दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या टोळीतून बोलत असल्याचे सांगितले. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळच्या टीटीनगर पोलिसात तक्रार दाखल केलीय.

यासंदर्भात भोपाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मोबाईलवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका अनोळखी नंबरवरून फोन करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर टोळीचा सदस्य अशी दिली.

खा. ठाकूर यांनी धमकी देणाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली असून असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यासंदर्भातील आडिओ टेप व्हायरल झालीय. प्रज्ञा ठाकूर यांना आलेल्या धमकीचा फोन नेमका कुठून आला याबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नसून, तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर देशासह परदेशातून या विधानाचा विरोध करण्यात आला. दरम्यान, शर्मा यांच्या या विधानाचे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी समर्थन करत भारत हिंदुंचा असल्याचे म्हटले होते. पाखंड्यांनी नेहमीच असे केले आहे. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन धर्म येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे विधान प्रज्ञा ठाकूर यांनी केले होते. यापार्श्वभूमीवर त्यांना ही धमकी देण्यात आली असावी अशी शक्यता व्यक्त होते आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -