
डॉ. मिलिंद घारपुरे
ओटीटी प्लॅटफॉर्म (इच्छुकांनी फुलफॉर्म गुगल करावा). बहुतांश वेळेला टीव्ही बघायला वेळ मिळतच नाही. चुकून मिळाला, तर रिमोट आई-बाबांच्या ताब्यात तरी नाहीतर मुलाच्या. ‘सास भी कभी बहू थी’चे दिवस जरी संपले असले तरी राजा राणी जोडी वगैरे तत्सम किंवा त्याहीपेक्षा टुकार निर्बुद्ध हास्य जत्रासारखे कार्यक्रम... चालूच!!! ...तर ईश कृपेने एका शुभ संध्याकाळी मला टीव्ही आणि त्याचा रिमोट प्राप्त जाहला. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, झी फाइव्ह, डिस्कवरी, सोनी लाइव्ह, डिस्ने हॉटस्टार... अरे बापरे!!! आता काय बघू??? सिरीयल, का ड्रामा, सस्पेन्स की थ्रिलर, पिक्चर, की एखादी डॉक्युमेंटरी? हे बघू का ते...? काही काही सीरियल खूपच मोठ्या, १०-१० सीजन, ४०-४० मिनिटाचा एक एक भाग. एवढे कधी बघणार...? अमुकचं रेटिंग खूपच कमी. तमुक छोटी पण स्टोरीलाईन खास नाही. अर्धवट जेवत, समोरच जेवणाच ताट चीवडत, हात वाळवत, ...धावतोय मी, रिमोट हातात धरून एका ओटीटी प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर... पण हवी ती गाडी काही मिळालीच नाही... न जेवताच जेवण झालं!!! थोडक्यात काय, काहीतरी हवं असतं माणसाला Entertain करणारं!!! काहीतरी नक्की....पण नक्की काय??? माहीत नाही. अशी गोंधळलेली अवस्था असतानाssss, दहा ऑप्शनस समोर आले, तर निवडायचा गोंधळ अजूनच उडणारच. चुका होणार, वेळ जाणार. असंच काहीसं होत असावं 'नव्या पिढीचं' या नवीन जगात काही निवडताना.! करिअर, ध्येय, आयुष्याचे उद्दिष्ट, दैनंदिन खऱ्या खोट्या गरजा, लाइफ पार्टनर अशा असंख्य गोष्टीबाबत. शिकायला हवं आणि शिकवायला हवं 'प्लॅटफॉर्म' निवडायला, हवी त्याच गाडीची वेळ नक्की साधायला...