रवींद्र तांबे
आपल्या देशात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. तेव्हा नैसर्गिक पर्यावरण टिकून ठेवण्यासाठी झाडांना वाचवणे किंवा झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे. देशात एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी घोषणा करून पर्यावरण संतुलन होणार नाही. त्यासाठी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून झाडांचा होणारा ऱ्हास टिकविण्यासाठी दर वर्षी किमान पावसाळ्यात एक झाड लावले पाहिजे. आता वरुणराजाचेही आगमन झाले आहे. सध्या झाडे ही सगळ्यांची मूलभूत गरज झाली आहे. त्यामुळे ‘एक व्यक्ती एक झाड’ या तत्त्वाचा अवलंब करून झाडे लावली पाहिजेत. झाडे ही नैसर्गिक संपती असली तरी प्रत्येक मानवाला प्राणवाय देण्याचे महान कार्य विनामूल्य करीत असते. तेव्हा पावसाळ्यात प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे.
झाडांचा विचार करता, झाडे उष्णता कमी करतात असे नाही, तर थंडीसुद्धा नियंत्रणात आणतात. म्हणजे मनुष्याला सर्वात मोठे संकट झाडामुळे टाळता येते. तेव्हा झाडांचे संगोपन मुलांप्रमाणे केले पाहिजे ही आजची खरी गरज आहे. त्यासाठी झाडांच्या संरक्षणासाठी जागरूकता करायला हवी.
पावसाळा आला की, जागतिक पर्यावरण दिनी ‘झाडे लावा देश वाचवा’ अशी लोकांना साद घालतो. पर्यावरण दिन साजरे करण्याचे निर्देशही दिले जाते. त्याचबरोबर झाडांविषयी जाणीव जागृती निर्माण केली गेली पाहिजे. झाडांमुळे वातावरण शुद्ध राहून प्रदूषण रोखण्याला मदत होते. तेव्हा झाडे ही सजीवांचे प्राणवायू आहे. मनुष्याचे आयुर्मान वाढवायचे असेल, तर झाडे लावलीच पाहिजे.
सध्या विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होताना दिसते. याचा परिणाम जंगलातील प्राणीसुद्धा कमी होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर सध्या जंगली प्राणी लोकवस्तीत दिवसाढवळ्या फिरताना दिसतात. तेव्हा सध्या चालताना रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी झाडे नसल्यामुळे कडक उन्हापायी मध्ये मध्ये डोळे मिटून घ्यावे लागतात. याचा परिणाम घरी आल्यावर जीव कासावीस होतो. त्यासाठी किमान पावसाच्या सुरुवातीस एक झाड लावण्याचा प्रत्येकाने निश्चय केला तरी उन्हाळ्यात काही ठिकाणी फिरल्यावर वाळवंटात गेल्यासारखं वाटते. ते चित्र बदलून वाळवंटासारखे दिसणारे ठिकाण हिरवेगार दिसेल. यासाठी मोकळ्या जागेवर झाडे लावली पाहिजे जेणेकरून झाडांमुळे त्या परिसरातील नैसर्गिक वातावरण निर्माण होऊन प्रत्येकाचे जीवन आरोग्ययुक्त होईल.
तेव्हा प्रत्येकांनी ‘छाया’ आणि ‘माया’ यातील फरक समजून घेतला पाहिजे. झाड आपणा सर्वांना छाया देते. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनाला आनंदी आणि उत्साही बनविण्यासाठी झाडांचे संगोपन मायेने करायला हवे. त्यातच मानवाचे खरे हित आहे.
आता झाडांची कत्तल करून आपले आयुष्य कमी करण्यापेक्षा झाडे लावून आपले आयुष्य वाढवूया. यासाठी पावसाळा सुरू होऊन वरुणराजानेही हजेरी लावली आहे. तेव्हा पुढील वर्षी म्हणण्यापेक्षा चालू वर्षापासून किमान प्रत्येकाने एक झाड लावूया.
युती सरकारच्या काळात ३३ कोटी झाडे लावण्याच्या जाहिराती डबल डेकरच्या गाडीवर हिरव्यागार दिसत होत्या. त्याला वर्षाकाठी रुपये १ हजार कोटी खर्च करण्यात आला होता. आता त्यातली किती झाडे जगली? अथवा किती झाडे मेली याचा शोध जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी आजच्या घडीला प्रत्येकाने किमान एक झाड लावणे आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यात कडक उन्हामुळे आपली अवस्था कशी झाली याचा अनुभव प्रत्येकाने घेतला आहे. कडक उन्हाळ्याचे तापमान कमी करण्यासाठी किमान एक झाड लावलेच पाहिजे असे प्रत्येकाने आज वचन बद्द होऊया.
सध्या रस्ते रुंद करण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झालेली दिसत आहे. तसेच रेल्वेचेही जाळे दिवसेंदिवस विखुरले जात आहे. तेव्हा डोंगरातून बोगदे खणण्याचे काम चालू आहे. त्यानंतर बोगद्यावरील वजन कमी करण्यासाठी डोंगर सपाट केले जात असून यात अनेक मोठ-मोठी झाडे मुळासकट तोडली जात आहेत. याचा परिणाम जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.
आता जरी जागतिक पर्यावरण दिन जरी होऊन गेला तरी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवूया, अशी आज प्रामाणिकपणे शपथ घेऊया.