काबुल (हिं.स) : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील कार्ट-ए-परवान गुरुद्वारावर हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वाराच्या आसपासच्या परिसरात दहशतवाद्यांनी गोळीबार केला तसेच स्फोटही घडवून आणले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराला वेढा घातला.
दहशतवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक सुरू झाली. अनेक भाविक गुरूद्वारात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अर्ध्या तासाच्या फरकाने लागोपाठ दोन स्फोट झाले. स्फोटामुळे आकाशात धुराचे लोट पसरले.
अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे.