नवी दिल्ली : आईला याची जाणीव होत होती की मी वेगळ्याच दिशेने जात आहे. मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, पण याची जाणीव आईला आधीच झाली होती. आईने मला कायमचे आपल्या सिद्धांतांवर ठाम राहण्याचा आणि गरीबांसाठी काम करण्याला प्रेरित केले. माझे मुख्यमंत्री होणे निश्चित झाले, तेव्हा मी गुजरातमध्ये नव्हतो. थेट एअरपोर्टवरुन आईला भेटायला गेलो होतो. पण काम करताना तू लाच घेऊ नकोस, असे आईने मला बजावले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्लॉग’मध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबा या आज १०० वर्षांच्या झाल्या, यानिमित्त मोदींनी खास ब्लॉग लिहिला असून या ब्लॉगला ‘माँ’ असे नाव दिले आहे. या ब्लॉगमधून त्यांनी आपल्या आईने आपली जडणघडण कशी केली याची माहिती दिली आहे. आज आपण देशाचे पतंप्रधान बनलो आहोत, त्यामध्ये आई-वडिलांच्या संस्कारांचा मोठा वाटा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
मोदी आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात, माझी आई सामान्य आहे, पण तितकीच असामान्य पण आहे. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक महामारीत माझ्या आईच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे माझ्या आईला आईचे प्रेम मिळाले नाही. आईला शाळेचे दारही पहायला मिळाले नाही, तिने केवळ गरिबीच पाहिली आहे. बालपणीच्या संघर्षाने माझ्या आईला खूपच लवकर मोठे बनवले. आपल्या भावंडांमध्येही ती मोठी होती अन् सासरी मोठी सून. त्यामुळे साहजिकच तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. वडनगरमध्ये आमचे घर हे केवळ मातीच्या भिंती होत्या. या घरात आम्ही भावंड आणि आई-वडील राहत होतो. अशातचही कोणताही तणाव न घेता माझ्या आई-वडिलांनी त्यांचे कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पाडले.
घरातून लवकर बाहेर पडून चहाच्या गाडीवर जाण्याचे वडिलांचे नित्यकर्म होते. वडिलांना घराबाहेर पडण्यापूर्वी आई भल्या पहाटे ४ वाजता उठायची. आपल्या मुलांनी शिक्षण सोडून आपली मदत करावी, असे आईला कधीही वाटले नाही. उलट आम्हा भावंडांना आई-वडिलांना मदत करावीशी वाटत असे. घर खर्च चालवण्यासाठी माझ्या आईने दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडीही केली. वेळ काढून चरखाही तिने चालवला आहे. स्वतःच्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहाणे, आईला आवडत नव्हते. घर स्वच्छ ठेवणे ही आईची प्राथमिकता असायची, असेही मोदींनी आईची आठवण सांगताना ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
Maa…this isn’t a mere word but it captures a range of emotions. Today, 18th June is the day my Mother Heeraba enters her 100th year. On this special day, I have penned a few thoughts expressing joy and gratitude. https://t.co/KnhBmUp2se
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
माझ्या आईचा माझ्यावर कायम अतूट विश्वास राहिला आहे. तिने दिलेल्या संस्कारावर तिचा पूर्ण भरवसा आहे. माझ्यासोबत ती कधी कार्यक्रमांमध्ये येत नाही. पण एकदा एका कार्यक्रमात ती आली होती तेव्हा तिनं माझ्यावर टीकाही केली होती. ईश्वरावर माझ्या आईची मोठी भक्ती आहे पण ती अंधश्रद्धेपासून दूर राहते. सुरुवातीपासूनच ती कबीरपंथी राहिली आहे. आजही ती त्याच परंपरेतून पूजापाठ करते, अशा शब्दांत त्यांनी आईच्या वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.