पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के एवढा लागला आहे.
मागील वर्षा पेक्षा यंदाच्या निकालात १.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.२७ टक्के तर सर्वात कमी नाशिक विभागाचा ९५.९० टक्के एवढा आहे. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली.
या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात ८ लाख ८९ हजार ५०६ मुले तर ७ लाख ४९ हजार ४५८ मुलींचा समावेश होता. राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यावेळी सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते.
विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल – पुणे – ९६.९६, नागपूर- ९७, औरंगाबाद- ९६.३३, मुंबई- ९६.९४, कोल्हापूर- ९८.५०, अमरावती- ९६.८१, नाशिक- ९५.९०, लातूर- ९७.२७, कोकण -९९.२७.
निकाल
- मुले – ९६.०६ टक्के
- मुली – ९७.९६ टक्के