Wednesday, August 27, 2025

कोकणात रिफायनरी प्रकल्प होणारच

कोकणात रिफायनरी प्रकल्प होणारच

रत्नागिरी (वार्ताहर) : ‘रिफायनरीला समर्थन मिळत असून विरोध राहिलेला नाही’, हे आम्ही पेट्रोलियम मंत्री यांना सांगितले आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे, असे प्रदेश भाजप सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सांगितले. ‘सध्या चारही बाजूने रिफायनरीला समर्थन मिळत आहे व तो सकारात्मक दिशेने जात आहे. केंद्रीय मंत्री देखील याबाबत सकारात्मक असून ते सौदीच्या कंपनीसोबत बोलतील. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी चर्चा करावी. आम्ही त्याला तयार आहोत. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आता नवीन पर्याय देखील सुचवावेत. रोजगाराच्या मुद्द्यावर सर्वांनी विचार करावा’, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.

कोकणातील रिफायनरीचा मुद्दा, राष्ट्रपतीपदाची निवडणूक, विधान परिषद निवडणुकीवरून निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार प्रहार चढवला आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यावर देखील काही आरोप केले आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांच्या हालचाली यावर देखील निलेश राणे यांनी यावेळी विधान परिषद निवडणुकीत देखील भाजप विजयी होईल व देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तिवरे धरण प्रश्नी कोर्टात जाणार...

तिवरे धरण फुटून ३ वर्षे झाली. यातील दोषींवर कारवाईबाबत अहवाल दिला गेला आहे. पण अद्याप त्यामध्ये काहीही कारवाई झालेली नाही. तिवरेमधील ठेकेदार शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण देखील आहेत. या सर्व प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी वेळ पडल्यास मी कोर्टात जाईन, अशी माहिती देखील यावेळी राणे यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा