नवी दिल्ली (हिं.स.) : पायाभूत सुविधांच्या विकासात ‘गुणवत्तेवर’ लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन कल्पना, संशोधनातील माहिती व तंत्रज्ञानासाठी इनोव्हेशन बँक स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला आहे. इंडियन रोड्स काँग्रेसच्या २२२ व्या मध्यावधी परिषद बैठकीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
आयआरसीकडून नवीन उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करून सर्व अभियंत्यांनी नवोन्मेष केंद्रस्थानी ठेवावा, असे त्यांनी सांगितले. आयआरसीने आयआयटी आणि जागतिक संस्थांच्या मदतीने जागतिक दर्जाची अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित केली पाहिजे. भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यात पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा थेट संबंध त्या प्रदेशाच्या समृद्धीशी असतो. रस्ते पायाभूत सुविधा लोक, संस्कृती आणि समाज यांना जोडतात आणि सामाजिक-आर्थिक विकासाद्वारे समृद्धी आणतात, असे गडकरी यांनी सांगितले. गेल्या ८ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी २०१४ मधील ९१ हजार किमीवरून ५० टक्क्यांपेक्षा अधिकने वाढून आता सुमारे १.४७ लाख किमी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आमचे सरकार २०२५ पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे २ लाख किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्यासाठी समर्पितपणे काम करत आहे. गेल्या ८ वर्षांत आम्ही अनेक जागतिक विक्रम केले आहेत, असेही ते म्हणाले.
सरकार ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास करण्यात, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (एनएचआयडीसीएल) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रदेशाचा राष्ट्रीय महामार्ग वाटा १० टक्के आहे. आतापर्यंत २३४४ किलोमीटर महामार्ग ४५ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
बांधकामासाठी जगातील सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी तंत्रज्ञान आणि नवीन साहित्य स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले. सिद्ध तंत्रज्ञानाचा वापर आणि बांधकाम खर्च कमी करणे, या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. गुणवत्ता राखत बांधकामाचा खर्च कमी करण्याची गरज गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.






