Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसंगणकीय सुवर्ण पावती

संगणकीय सुवर्ण पावती

उदय पिंगळे

गुंतवणूक या दृष्टिकोनातून, आपण सोने या धातूकडे आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. एकहाती किंवा थोडे थोडे सोने जमा करून त्यात भर घालून मनाजोगते दागिने करणे एवढाच आपला सोन्याशी संबंध. संस्कार, परंपरेची जपणूक, प्रेमाचे प्रतीक आणि पिढीजात वारसा म्हणून याची आवश्यकता असली तरी खऱ्या अर्थाने ही गुंतवणूक होत नाही. नवीन शैलीचा दागिना बनवायला जितक्या सहजतेने जुने दागिने मोडले जातात त्या तुलनेत अत्यंत कठीण प्रसंगातही ते विकून पैसे उभे उभारणे होता होईतो टाळले जाते. त्यामुळे यातून मानसिक समाधानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष परतावा मिळत नाही, या उलट अशा स्वरूपाच्या व्यवहारात वजनात घट आणि मजुरी यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून आपले नुकसानच होते, याशिवाय त्यावर कर द्यावा लागतो. सोने हे पर्यायी चलन म्हणून समजले जाते, चलन या शब्दाचा संबंध गतिमानतेशी आहे. जेव्हा त्याचे दागिने बनतात तेव्हा त्याची गती म्हणजे हालचाल थांबते. तेव्हा आपल्या गरजेहून अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने घेणे यात आर्थिक नुकसान आहेच. याशिवाय सुरक्षितपणे साठवण्याची जोखीम आहेच.

आपली गुंतवणूक विविध प्रकारात विभागून असावी. ती सुरक्षित, महागाईहून अधिक परतावा देणारी असावी आणि त्यात रोकड सुलभता असावी. गेल्या १० वर्षांत विविध गुंतवणूक प्रकारांनी महागाईच्या तुलनेत किती परतावा दिला हे तपासून पाहिले असता शुद्ध स्वरूपातील सोन्यास हे तिन्ही निकष लागू पडतात. सोन्यातून मिळालेला परतावा १०% असून तो महागाईवर मात करणारा आहे. मोठ्या आर्थिक संकटात लोकांचा प्रचलित चलनावरील विश्वास कमी होऊन ते अधिक प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करीत असल्याने सुवर्ण गुंतवणुकीचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. आपल्या एकूण गुंतवणुकीतील १०% भाग सोन्यामध्ये असावा याबाबत सर्व गुंतवणूक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. हा धातू दुर्मीळ आणि जगमान्य असल्याने त्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. जगभरातील बँकांची पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्यास प्रथम पसंती आहे.

गुंतवणूक म्हणून सोने खालील प्रकारांनी खरेदी करता येईल 

  • नाणे / वळे स्वरूपात सोन्याची खरेदी
  • सुवर्ण संचय योजना 
  • गोल्ड फंडातील गुंतवणूक
  • गोल्ड ईटीएफ
  • ई गोल्ड
  • डिजिटल गोल्ड
  • सार्वभौम सुवर्ण रोखे

सोने फक्त खरेदी किंवा खरेदी/विक्रीसाठी असे अनेक पर्याय उपलब्ध असले प्रचलित यंत्रणेतून पारदर्शक पद्धतीने सोन्याच्या बाजारभावाचा शोध घेता येण्यावर अनेक मर्यादा आहेत. यासाठी चालू अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्र्यांनी कोठार विकास आणि नियमन प्राधिकरणाची निर्मिती आणि स्वतंत्र सुवर्ण बाजाराची स्थापना यांची घोषणा केली. त्याचे नियमन सेबीकडे असेल, यासंबंधातील नवी नियमावली लवकरच सेबी जाहीर करेल अशी घोषणा केली होती. यातील अपेक्षेनुसार सोन्याचा भाव हा खऱ्याखुऱ्या मागणी पुरवठा यांनी शोधला जावा यासाठी सोन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगणकीय सुवर्ण पावत्या तयार केल्या जातील. त्यांना सुवर्ण रोखे म्हणून मान्यता देण्याची सेबीची योजना असून यात शक्य असल्यास स्वतंत्र सुवर्णबाजार निर्माण करण्यास सेबीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे इजीआर आणि सोन्याचे प्रत्यक्ष स्वीकार आणि वितरण करणारा नियमित सुवर्ण बाजार भविष्यात निर्माण होऊ शकेल. जेथे या इजीआरची खरेदी विक्री केली जाईल. त्याची निर्मिती खऱ्याखुऱ्या सोन्याच्या बदल्यात केली गेल्याने यासाठी एक स्वतंत्र भांडार यंत्रणा तयार करण्यात येत आहे. याबाबत ३१ डिसेंबर २०२१ ला सेबीने जाहीर केलेल्या अधिसूचनेप्रमाणे भांडार व्यवस्थापकांची नोंदणी करण्यात येऊन इजीआर तयार करण्यासाठी तसेच त्यांच्याकडे ठेवलेल्या सोन्यासाठी भांडार सेवा प्रदान करण्यासाठीचे मध्यस्थ म्हणून सेबीकडून नियमन केले जाईल. भांडार व्यवस्थापक घातू स्वरूपातील सोन्याचा स्वीकार करून त्याचे इजीआर रोख्यात रूपांतर करेल. जमा झालेले सोने सुरक्षित ठिकाणी साठवण्यात येईल.

डिपॉसीटरीमधील व्यवहारांची नोंद ठेवेल याचप्रमाणे एक्स्चेंजमधील झालेले व्यवहार नियमित काळात पूर्ण करेल. भांडार व्यवस्थापक म्हणून व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेली व्यक्ती किंवा संस्था ज्यांची किमान संपत्ती ₹ ५० कोटी असेल. सेबीद्वारा नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र वैध असेल. भांडार व्यवस्थापक अन्य कोणताही व्यवसाय करीत असल्यास सोने साठवण्यासाठी, इजीआर व्यवसायासाठी स्वतंत्र जागा आणि साठवणुकीचे ठिकाण असणे गरजेचे आहे. या जागेत अन्य वस्तूंचा साठा करता येणार नाही.

सुवर्ण बाजारातील गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी सेबी संबधित भांडाराची, ठेवींची, कागदपत्रांची तपासणी करू शकेल. अशी तपासणी करण्यापूर्वी १० दिवस आधी भांडारधारकांना त्याची पूर्वसूचना देण्यात येईल. याबाबत सर्व नियम ३१ डिसेंबर २०२१ पासून लागू झाले असून त्यामुळे सुवर्णबाजारात मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -