सांगली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. सांगलीतील इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट रद्द केले.
शिराळा न्यायालयाने राज यांच्याविरोधात अटक वॉरंट काढल्यानंतर त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करुन त्यांना जामीन मंजूर करावा, असा अर्ज इस्लामपूर इथल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली. कनिष्ठ न्यायालय ज्यावेळी निर्देश देईल त्यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावे, असे कोर्टाने सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.
दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच २८ जानेवारी, २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी आणि २८ एप्रिल २०२२ या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.