पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये दहावी-बारावीची पुरवणी (फेर) परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा २१ जुलै, तर दहावीची परीक्षा २७ जुलै रोजी सुरू होईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ ते ८ ऑगस्टदरम्यान, तर बारावीची २० जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान आयोजित केली आहे. या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकाची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येईल आणि ते वेळापत्रक अंतिम असेल. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १० जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० जूनपासून अर्ज भरता येणार आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.