Wednesday, July 9, 2025

अमेरिकेत लासलगाव मार्गे ३६० मेट्रिक टन आंबे निर्यात

अमेरिकेत लासलगाव मार्गे ३६० मेट्रिक टन आंबे निर्यात

समीर पठाण


लासलगाव : भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंती असते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही १२ एप्रिल पासून लासलगाव मार्गे सुरू झाली आहे.


या हंगामात ३६० मॅट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो याठिकाणी आंबा निर्यात झाला आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत झाली आहे.


लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन ३६० मेट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाले. सन २०१९ च्या तुलनेत आंबा निर्यातीत ३२५ मे. टनाने घट झाल्याचे दिसत आहे. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये आंबा निर्यात न झाल्याने निर्यातीत घट झाल्याचे दिसत आहे.


भारतामध्ये विविध प्रकारच्या आंब्यांच्या जाती असून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व इतर देशांना निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होते. या निर्यातीमध्ये जर आपण विचार केला तर यंदा लासलगाव मार्गे झालेली सगळी निर्यात एकट्या अमेरिकेत झाली आहे.


किरिणोत्सर्ग स्त्रोत फूड प्रोसेसिंग देशातील चार प्रमुख यंत्रणाना उपलब्ध करून दिले जात असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, गुजरातमधील वापी आणि अहमदाबाद तसेच कर्नाटक मधील बंगलुरू येथील केंद्रांचा समावेश आहे. प्रक्रिया करून हे आंबे विमानाने पाठविले जात आहेत. त्यात पहिल्यांदा भारतीय केशर आंब्याची समुद्रामार्गे प्रथमच परदेशवारीही करण्यात यश आले आहे. नाशिक येथील हेमंत सानप या निर्यातदाराने धाडस दाखविले आहे. त्यामुळे पुढील वर्षी आंबा निर्यातीत आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा