Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडी'अग्निपथ' योजनेच्या विरोधात तरुणांची देशभर निदर्शने

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात तरुणांची देशभर निदर्शने

बिहारच्या छपरामध्ये पॅसेंजर रेल्वे पेटवली

नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्र सरकारने सैन्य भर्तीसाठी नव्याने आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश आणि दिल्लीत अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुणांनी निदर्शने केलीत. बिहारमध्ये तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून छपरा येथे आंदोलकांनी पॅसेंजर ट्रेन पेटवल्याची घटना घडली.

केंद्र सरकारच्या नव्या अग्निपथ योजनेनुसार भारतीय सैन्यात ४ वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. त्यातील २५ टक्के जवानांना लष्करी सेवेत पुढील १५ वर्षासाठी दाखल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला मोठा विरोध सुरू झाला आहे. बिहारमधील छपरा जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थी-युवकांनी छपरा जंक्शनजवळ एका पॅसेंजर ट्रेनला आग लावल्याची घटना घडली. जहानाबाद आणि नवादामध्ये सैन्य भरतीसाठी तयारी करत असलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

भारतीय सैन्यातील कंत्राटी पद्धतीच्या नोकरीविरोधात नवादामधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त करीत आहेत. नवादामधील प्रजातंत्र चौकात विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत गदारोळ केला. सहरसामध्ये सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी रेले रोको आंदोलन केले. काहींनी राजधानी एक्स्प्रेसच्या कोचवर लाठीने हल्लादेखील केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिहारच्या आरा जिल्ह्यातही आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. आरा रेल्वे स्थानकात आंदोलकांनी तोडफोड केली. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. बेगूसरायमध्येही युवकांनी टायर जाळून केंद्र सरकारच्या या योजनेला विरोध दर्शवला आहे.

बिहारमधील आंदोलनाच्या वणव्याची धग हरयाणामध्ये ही जाणवू लागली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये विद्यार्थ्यांनी दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केला आहे. पलवलमध्ये ही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. बुधवारी, बिहारमधील बक्सर, मुझफ्फनगरसह काही ठिकाणी आंदोलन झाले होते. त्यानंतर आजही आंदोलन सुरू राहिले. राजस्थानमध्येही युवकांनी या योजनेविरोधात आंदोलन केले होते. बुधवारी दुपारी आंदोलक विद्यार्थ्यांनी जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला होता. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना महामार्गावरून हटवले. या प्रकरणी १० आंदोलक युवकांना ताब्यात घेतले. तर, अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -