संतोष वायंगणकर
कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये भातशेती मोठ्या प्रमाणावर पूर्वी केली जायची. मधल्या काळात पारंपारिक बियाण्यांमुळे भातशेती परवडत नसल्याची माऊथ पब्लिसिटी एवढी झाली की, अनेकांनी भातशेती बंदच केली. कारणेही खरंतर तशीच होती. शेतात राबणारे मजूर मिळत नव्हते. फार पूर्वी एकदुसऱ्याच्या शेतात काम करून भातशेती लावणी केली जायची; परंतु गावाकडुन मुंबईत जाणाऱ्यांची संख्या वाढली व भातशेती कमी होऊ लागली. ४-५ वर्षांपूर्वी कोकणातील ग्रामीण भागात फिरल्यास कोकणात पडीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसू लागले.
कोकणातील बंद घरांची संख्याही वाढली आहे. गावात माणसेच रहात नाहीत, तर शेती करणार कोण? पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी शहरांमध्ये व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेले आणि दुसरे जिल्ह्यातीलच त्यांच्या त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी स्थिरावलेल्यांची संख्याही कमी नाही. यामुळे सत्तरी पार केलेली माणसे गावातील घराच्या ओढीने गावात राहिलेली आहेत. शेती व्हायला हवी, असे त्यांना मनोमन वाटते; परंतु त्यांच्या मनाची उर्मी आणि ऊर्जा शेतात कष्ट करण्यास पुरेशी नाही. यामुळे पडीक शेतजमीन वाढत गेली. यातच काहींनी त्याच शेतजमिनीत काजू, आंबा बागाही केल्या. यामुळे दर वर्षी भातकापणीच्या हंगामानंतर घरामध्ये भाताची दिसणारी रास मात्र दिसेनाशी झाली.
भातशेती हा खरंतर ‘गजालीचा’ विषय बनला; परंतु गेल्या २ वर्षांत हे चक्र उलटे फिरले आहे. कोकणातील लोक भातशेती करू लागले आहेत असे सांगितले, तर कदाचित काहीजण ही बाब हसण्यावारी नेतील; परंतु यातले वास्तव फारच वेगळे आहे. अगदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोक भातशेती करू लागले आहेत. एककाडी या संकरीत बियाण्याची पेरणी करून उत्पादन वाढविण्यात आले. भात बियाणे ६४४४, ३३३३, १३०३ या संकरीत भात बियाण्यांची पेरणी करून कोकणातील कृषी क्षेत्रात शेतकरी राबू लागला आहे. केंद्र सरकारने गत वर्षी १९४० रू. हमीभाव जाहीर केला होता. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या भातशेतीतून शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल २५ कोटी रूपये जमा झाले आहेत. २०१७-१८ या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४,००० क्विंटल भात उत्पादित झाले होते. गत वर्षी २०२१-२२ या हंगामात तब्बल ९०,००० क्विंटल भात उत्पादित झाले. यावरून सहज समजून येईल की, भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने भात खरेदीचा हमीभाव या वर्षीच्या हंगामासाठी २०४०, तर ‘ए’ ग्रेड भातासाठी २०६० हमीभाव जाहीर केला आहे. यामुळेही पुन्हा एकदा कोकणातील तरुण पुन्हा भातशेतीकडे वळला आहे. शेतात राबणाऱ्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चिज होत असल्याने भातशेती वाढली आहे. १४ हजार वरून ९० हजार क्विं. भाताचे उत्पादन केले गेले ही गरुडभरारी संकरीत बियाण्यांमुळे शक्य झाली.
पूर्वी एक मालवणी म्हण प्रचलित होती, कोकणी भात बोकणी भात व मासे मिळाले की, कोकणी माणसाला कुठल्या पंचपक्वान्नांची गरज नाही. पूर्वी स्वत:च्या कुटुंबाला वर्षभरासाठी पुरणारे तांदूळ घरात असले की, त्या भाताच्या श्रीमंतीत कोकणातील माणूस आनंदी असायचा. वर्षभरात घरी येणाऱ्या पैपाहुण्यांना आम्ही रेशनचा तांदूळ घेत नाही. वर्षभर आम्हाला घरचे तांदूळ पुरतात. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह असायचा आणि कष्टाचे चिज होत असल्याचे समाधानही दिसायचे. पारंपरिक बियाण्यांच्या पेरणीतून फार अधिक विक्री करण्याएवढे काही मिळत नव्हते. फक्त कुटुंब चालायचे; परंतु अलीकडे नव्या तंत्राच्या सहाय्याने होणाऱ्या या भातशेतीत प्रगतीशील शेतकरी म्हणून लौकिक प्राप्त होतो. एवढी क्रांती भातशेतीत होत आहे.
कोकण कृषी विद्यापिठाचे डॉ. शेट्ये यांनी भातशेतीतून कसा नफा होऊ शकतो, याचे मार्गदर्शन करीत भातशेतीत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोकणातील एक प्रगतीशील तरुण शेतकरी संदीप राणे यांनी कमी जागेत भातशेती करूनही अधिकचे उत्पन्न घेऊ शकतो हे दाखवून दिले आहे. कोकणात आंबा, काजू, कोकम बागायतीत राबणारे तरुण जसे दिसतात तसेच कलिंगडाच्या शेतीतही कष्ट करून आपल नशिब बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. गवारेड्यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे नुकसानही होत आहे. मात्र हार न मानता शेतकरी उभारी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. गेल्या काही वर्षांत कोकणात भातशेती बंद होती. मात्र गेल्या २ वर्षांत हे चित्र बदलले. भातशेतीतून केवळ कुटुंबाला खाण्यापुरता तांदूळ हा विचार बदलून भातशेतीतून चांगली कमाई करण्याचा विचार रुजतोय. कोकणातील भातशेतीत घडणारा हा बदल कोकणातील घराघरांत आर्थिक समृद्धी आणेल. मात्र यासाठी ज्यांनी कष्टातून सोनं निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलाय त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. नोकरी, काम नाही म्हणून नाराज न होता संकरीत बियाणी, आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीतूनही राबणाऱ्यांचे हात लक्ष्मीपुत्र म्हणून ओळखले जातील.