
सिंधुनगरी (प्रतिनिधी) : कोकणातील रिफायनरी प्रकल्पातील विरोध आता मावळत चालला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्यानेच केंद्र सरकारला पत्र पाठवून रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून विनंती केली आहे. भारतीय जनता पक्षाने हा रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून प्रथमपासूनच भूमिका घेतली होती. हा प्रकल्प लवकर सुरू व्हावा म्हणून केंद्र सरकारने हे काम हाती घेतल्याचे भाजप नेते तथा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा म्हणून नुकतीच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची निलेश राणे यांनी भेट घेतली होती. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, जवळपास तीन लाख कोटी या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. म्हणूनच या भागातील नागरिकांना, कोकणवासीयांना या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक सोयीसुविधा मिळाव्यात या दृष्टीने आपणही भेट घेतली होती.
मग तो पाणीप्रश्न असो किंवा शैक्षणिक सुविधांचा प्रश्न असो त्याबाबत सरकारनेही विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावा म्हणून आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचेही लक्ष वेधल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.
या रिफायनरी प्रकल्पामुळे या भागात फार मोठी आर्थिक उलाढाल होणार असून कोकणामध्ये हा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे. त्यामुळे या भागात विकासाची मोठी संधी आहे. चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा असाव्यात तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराचे एक मोठे केंद्र बनावे यादृष्टीने युवक युवतींना प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.