नागपूर (हिं.स.) : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. बहुप्रतिक्षीत मान्सून गुरुवारी १६ जून रोजी विदर्भात दाखल झाला आहे. विदर्भातील नागपूरसह इतर ठिकाणी मान्सूनचा पहिला पाऊस पडला असून प्रादेशिक हवामान खात्याने त्याला दुजोरा दिला. विदर्भात हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू असून हवामान खात्याने हा पाऊस मान्सूनचा असल्याचे जाहीर केलेय.
महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पाऊस सरी कोसळत असताना नागपूरसह विदर्भात अजूनही गर्मी आणि उकाडा होता. त्यामुळे वैदर्भीय पावसाची चातकासारखी वाट पाहात होते. प्रादेशिक हवामान खात्याने यापूर्वी विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजे १९ जूनपासून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र तत्पूर्वीच मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात राज्य, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग, संपूर्ण तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग आणि दक्षिण ओडिशा, बहुतांश भागात पुढे सरकला आहे. कोस्टल आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिममध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराचे आणखी काही भागात गुरूवार, १६ जून रोजी दाखल झाला आहे.
उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य, मध्य प्रदेश, विदर्भाचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेश आणि पश्चिममध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, काही भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, उप हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि बिहारचा आणखी काही भाग, पूर्व उत्तर प्रदेशचा काही भागात पुढील दोन ते तीन दिवसांत सक्रिय होईल.