
मुंबई (क्रा. वार्ताहर) : सोशल मिडियावर जाहिरात देऊन मोठया प्रमाणात बनावट घड्याळयाची विक्री करणाऱ्या दक्षिण मुंबईतील मनिष मार्केटमधील पाच व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी रूपयांच्या किंमतीची घड्याळे जप्त करण्यात आली आहे.
मुंबई शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर धंदयावर बेधडक कारवाई करण्याचे आदेश मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने सी.बी. कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणेच्या हद्दीतील मनिष मार्केट व अल-सबा मार्केटमध्ये काही दुकानांत दुकानदार DIESEL, MICHAEAL KORS, ARMANI, FOSSIL, G-SHOCK व इतर नामांकित कंपन्याच्या बनावट घडयाळ्यांचा साठा करून विक्रीकरीता ठेवतात. तसेच हे दुकानदार हे फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयावर जाहीराती देऊन मोठ्याप्रमाणात बनावट घडयाळ्यांची नागरीकांना विक्री करत असल्याचे समजले होते. याप्रकरणी मनिष मार्केट व अल सबा मार्केट येथील दुकानावर पोलीस पथकाने छापा टाकला.
यावेळी दुकानांमध्ये DIESEL, MICHAEAL KORS, ARMANI , FOSSIL, G SHOCK या कंपनीच्या विविध मॉडेल्सचे रू . एक कोटी सहा लाख ७६ हजार ५०० / - किंमतीची एकूण दोन हजार ८२ बनावट मनगटी घडयाळे जप्त केले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त संजय पांडे, पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे प्रविण पडवळ, पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे - २ महेंद्र पंडीत, यांच्या मार्गदर्शनाखाली सी.बी. कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, स.पो.नि. संतोष ब्यागेहळ्ळी, स.पो.नि. रूपेश दरेकर, पो.ह. महेंद्र जाधव, चंद्रकांत वळेकर, महेश नाईक, महेंद दरेकर, पोलीस नाईक शेखर भंडारी, संतोष पाटील पोलीस शिपाई नितीन मगर, भरत खारवी, रोहन शेंडगे, म.पो. शि . हिना राऊत, संगीता गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.