Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीसाखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे

साखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे

भारत जगात पहिल्या क्रमांकावर

पुणे (हिं.स.) : यंदाच्या गाळप हंगामात भारताने साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला. भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पिछाडीवर गेला आहे. देशात यंदा ३५० लाख टन साखर उत्पादन झाले असून महाराष्ट्राचा त्यातील वाटा ५१ टक्के म्हणजे १३८ लाख टनांचा आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली.

देशाचे व देशात महाराष्ट्राचे हे साखरेचे विक्रमी उत्पादन आहे. ब्राझीलने त्यांचे साखर उत्पादन इथेनॉलकडे वळवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर कमी पडली व ती पोकळी भारताने तसेच महाराष्ट्राने भरून काढली. भारतामधून झालेल्या ९० लाख टन साखरेपैकी ५१ टक्के साखर एकट्या महाराष्ट्राने निर्यात केली आहे.

साखरेबरोबरच यंदा इथेनॉल उत्पादनातही राज्यातील साखर क्षेत्राने आघाडी घेतली आहे. २०० कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता राज्याने प्राप्त केली. त्यापैकी ११२ कोटी लिटर इथेनॉलचे करार साखर कारखान्यांनी वेगवेगळ्या ऑईल कंपन्यांबरोबर केले आहेत.

यंदा १९९ कारखान्यांनी १३२०.३१ लाख टन उसाचे गाळप केले. त्यातून १३८ लाख टन साखर निर्माण झाली. सरासरी ऊस उतारा १०.४० असा होता. २४० दिवस हंगाम झाला. त्यातील सरासरी १७३ दिवस गाळप झाले. सहवीज निर्मितीमधून कारखान्यांना अडीच हजार कोटी रुपये मिळाले. विक्रमी गाळप होऊनही कारखान्यांना इथेनॉलचे, निर्यातीचे, सहवीजनिर्मितीचे पैसे लगेचच मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आतापर्यंत एफआरपीचे (उसाची रास्त किफायतशीर किंमत) ९६ टक्के पैसे मिळाले. त्यामुळे आर्थिक स्तरावर कारखाने, शेतकरी अशा दोन्ही घटकांना यंदाचा गाळप हंगाम दिलासा देणारा ठरला, असे गायकवाड यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -