Saturday, October 25, 2025
Happy Diwali

देशमुख-मलिकांच्या मतदानावरून न्यायालयात खडाजंगी

मुंबई : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकारण तापताना दिसत आहे. यातच राज्यसभा निवडणुकीत मतदानाची परवानगी मागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पदरी निराशाच पडली होती. मात्र, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी मतदानाची परवानगी मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या दोघांच्या वतीने उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाल्याचे सांगितले जात आहे.

दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी द्यायची की नाही, याबाबत मुंबई उच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयातील या सुनावणीवेळी देशमुख-मलिकांचे वकील आणि ईडीचे वकील यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. केवळ मतदानाच्या दिवशी मत टाकण्यासाठी पोलिस सुरक्षा व्यवस्थेत पाठवण्याचे निर्देश द्यावेत, एवढीच मर्यादित विनंती असल्याचे मलिक आणि देशमुखांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

तर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ६२(५) अन्वये कोणत्याही प्रकारच्या कैद्याला कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकारच नाही. मग न्यायालयाने विशेषाधिकारात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून आहे. उद्या (१७ जून) दुपारी निर्णय देणार असल्याचे न्या. निजामुद्दीन जमादार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment