मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून ‘मिशन ४८’ ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजप तयारी करत आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
२०२४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. ‘लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा आणि मोदींनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा’ असा संदेश विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबईत गुरूवारी यासंदर्भातील बैठक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकींच्या संदर्भात ही बैठक झाल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारसंघावर जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा सामावेश असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.
फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकसभेसाठी केंद्रातून विनोद तावडे तर राज्यातून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधणार आहे. १६ मतदारसंघांमध्ये जुलै महिन्यात केंद्रीय मंत्र्यांचा प्रवासही होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकानंगले मतदार संघावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पुढील १८ महिन्यात काय करायचे हे नियोजन आखले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
‘पुढच्या १७ ते १८ महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसे काम करायचे असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यात असलेल्या ४८ पैकी ४८ लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असे मत फडणवीस म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीला दोन वर्ष असताना भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले. शिवसेनेकडे असलेल्या १८ लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले काम लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन फडणवीसांनी बैठकीत केले आहे. बारामती, कोल्हापूर, सातारा, मावळ, उस्मानाबाद, औरंगाबाद हिंगोली या लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देण्यात येणार आहे.