आपल्या सर्वच संतांनी पुन्हा पुन्हा सांगितले की, परमेश्वर हा सर्व विश्वांत भरलेला आहे. सर्व विश्व निर्माण होते ते परमेश्वराकडून निर्माण होते आणि ज्याच्याकडून हे निर्माण होते तो ते जे निर्माण झालेले आहे, त्यात वास करून राहातो. हे सर्व संतांनी सांगितले, पण ही गोष्ट लोक ध्यानात घेत नाहीत व जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. गणितात हातचा धरायला विसरतात आणि गणित चुकते तसेच जीवनात होते. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही. परमेश्वर म्हणजे व्यक्ती नाही. परमेश्वर हे प्रकरणच वेगळे आहे. तो सगुण आहे. तो निर्गुण आहे. दोन्ही आहे तो असा आहे तो तसा आहे असे सांगता येणार नाही. कारण परमेश्वर हा अनादी व अनंत आहे. खरे म्हणजे विश्वसुद्धा अनादी व अनंतच आहे. विश्वाचा नाश होणार हे म्हणणाऱ्या लोकांना परमेश्वराबद्दलचे ज्ञान नसते व विश्वाबद्दलचेही ज्ञान नसते. काही सायंटिस्ट असे सांगू लागलेले आहेत की जगाचा विस्तार होतो आहे व तो सुद्धा वेगाने होतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तार हाच शब्द वापरलेला आहे. “तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग”. ज्ञानेश्वर महाराजांनी सात वर्षांपूर्वी सांगितले. भगवंतांनी सांगून ठेवले होते ते सायंटिस्ट आज सांगत आहेत. जग म्हणजे देवाचा विस्तार. जग हे विस्तारत विस्तारतच जाते. जगाचा नाश होणार असे म्हणतो त्याला काहीही कळलेले नसते. जीवनविद्या सांगते, जगाचा नाश होणार नाही कारण विश्व हे अनादी आहे, अनंत आहे. माणसाचा विस्तार होत असतो. प्राणी काय करतात? नर व मादी असतात. ते किती पिल्लांना जन्म देतात. निरनिराळे प्राणी किती पिल्लांना जन्म देतात. माणूस तरी कुठे कमी आहे? धृतराष्ट्राला शंभर मुले होती. विस्तार हा होतच असतो व विस्तार होतच राहाणे हा विवाचा स्वभावधर्म आहे. जगाचा नाश होणार ह्या गोष्टीवर विवास ठेवू नका. जसा परमेश्वर हा अनादी अनंत आहे तसे विश्व हेही अनादी अनंत आहे. जेथून निर्माण झाले ते त्याला घेऊनच आले. “जेथूनी चराचर त्यासी भजे”. प्रत्येक प्राणीमात्रांत देव आहे हे हिंदूधर्म ठासून सांगतो. वाघ, सिंह, बैल किंवा गाढव असो किंवा माणूस असो या सर्वांत देव भरलेला आहे असे आपण म्हणतो, पण खरेतर देवात आपण भरलेले आहोत.
सदगुरू वामनराव पै