मीनाक्षी जगदाळे
लव्ह मॅरेज! लव्ह कम अरेंज मॅरेज!! स्वतःच्या आवडीचा जोडीदार शोधून, त्याच्यावर प्रेम करून त्यालाच जीवनसाथी बनवणे, जे स्वप्नात पाहिलं ते सत्यात उतरवणे, आपले प्रेम प्रकरण फुलवणे, यशस्वी करणे आणि तारुण्यात झोपळ्या वाचून झुलायचे!! युवा पिढीतील कोणालाही हवीशी वाटेल अशी ही संकल्पना. आज-कालचे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी स्वतःच्या शैक्षणिक आयुष्यातील वेळ विनाकारण फसव्या दिखाऊ प्रेमाच्या मागे लागून मोठ्या प्रमाणात वाया घालवतात. मुला-मुलींच्या जोड्या निव्वळ एकमेकांसोबत तासनतास भटकणे, एकत्र सेल्फी, फोटो काढणे, हॉटेल, कॅफेमध्ये गप्पा मारत बसणे, टू व्हिलरवर भन्नाट ड्राईव्ह करणे, कॉलेज ग्राऊंड, गार्डन, जीम, लायब्ररी या ठिकाणी पडीक असलेले दिसतात. म्हणायला त्यांच्यासाठी हे त्यांचं खरं प्रेम असतं आणि ते आयुष्यभर एकमेकांना साथ देणार असतात. महाविद्यालयीन आयुष्य मैत्री, एन्जॉय यांसाठी नक्कीच असते. पण हे करीत असताना आपले करिअरपणाला लावणे, शाळा-कॉलेजचे तास बुडवून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत दिवसभर गप्पा मारत बसणे,घरात खोटं बोलून कोणाला न सांगता क्लासच्या अभ्यासाच्या नावाखाली घराबाहेर राहणे हा अनेक विद्यार्थ्यांचा नित्यक्रम असतो.
या वयात हे सर्व करताना प्रचंड थ्रील, मज्जा, एक्साइटमेन्ट, आनंद अनुभवायला मिळतो, यात शंकाच नाही. परंतु हे सुरू असतानाच आपला खूप क्वालिटी टाइम आपण अतिशय फालतू तात्कालिक आनंदासाठी वाया घालवत असतो. थोड्याफार प्रमाणात, नियमांच्या चौकटीत राहून, सर्व मर्यादा सांभाळून या वयात आनंद उपभोगणे गैर नाही. पण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे, कोणासाठी कशासाठी किती वेळ वाया घालवावा, कोणाला आपल्या आयुष्यात किती जागा या वयात द्यावी, आपली बुद्धिमत्ता, हुशारी कुठे कशी वाया घालवावी यांचा सारासार विचार मुलं-मुली करताना दिसत नाहीत. कोणाच्या नादी लागून आपलीच मानसिक भावनिक स्थिती बिघडवून घ्यायची याचा सुमार या वयात नसतो.
या कालावधीमध्ये केलेली मेहनत, अभ्यास, परिश्रम तुम्हाला आयुष्यभरासाठी सेटल करू शकतात, पण याच वयात अनेक युवक-युवती भरकटलेले दिसतात. फ्रेंडशिप, अफेअर, रिलेशनशिप, अॅट्रॅक्शन, शारीरिक बदल आणि त्यातून निर्माण होणारी शारीरिक ओढ,भावनिक गदारोळ, सातत्याने बदलणारे मूड, दररोज होणारे मत आणि मनपरिवर्तन, दिशाहीन विचार यामुळे बहुतांश विद्यार्थी पालकांसोबतच स्वतःची देखील फसवणूक करीत असतात. नको त्या वेळेत आणि नाही त्या वयात स्वतःच्या भावना, मन कोणामध्येही गुंतवून बसल्यामुळे ना अभ्यासात लक्ष लागतं, ना इतर काही करण्यात मन लागतं.
मुलं-मुली शाळा, कॉलेज, क्लासला जातो सांगून घराबाहेर पडतात तेव्हा खरंच किती तास प्रामाणिकपणे तिथेच असतात हा मोठा प्रश्न आहे. घरातून घालून निघालेले ड्रेस, कपडे बदलून मुलांसोबत बाईकवर फिरण्याची मुलींची अजब शक्कल सर्वश्रुत आहे. रस्त्यात कोणीही ओळखीच्या लोकांनी, पालकांनी, नातेवाइकांनी आपल्याला ओळखू नये म्हणून दुसरेच कपडे घालून, तोंडाला पूर्ण स्कार्फ, रुमाल, स्टोल गुंडाळून बिनधास्तपणे मुला-मुलींना भटकताना आपण पाहत असतो. याही पलीकडे जाऊन एकमेकांना प्रेम प्रकरणात मदत करणारे मित्र-मैत्रिणी अगदी पद्धतशीरपणे हे सर्व दाबून नेतात. ती किंवा तो माझ्यासोबत होता, आम्ही एकत्र होतो, अभ्यास करत होतो यांसारखी कारणं घरी सांगून पालकांचा विश्वास संपादन करण्याचे काम हे मित्र-मैत्रिणी करतात. रात्रंदिवस एकमेकांशी मोबाइलवर चॅटिंग करणे, कानात हेडफोन घालून सातत्याने बोलत राहणे, सातत्याने डीपी, स्टेटस बदलण्यासाठी सैरभैर होणे, मोबाइलवर वेगवेगळ्या अॅप्लिकेशनमार्फत काहीना काही ऐकत राहणे, पाहत राहणे यावर आज-कालची पिढी उदंड वेळ वाया घालवताना दिसते. यामध्ये खरेच किती उपयोगी, कामाची माहिती, अभ्यासात उपयुक्त विषय पाहिले, वाचले जातात, हे ज्याचं त्याला माहिती. म्हणजेच घराबाहेर गर्लफ्रेंड्स, बॉयफ्रेंडसोबत केलेला टाइमपास वेगळा आणि घरात आल्यावर परत एकमेकांच्या आठवणीने व्याकुळ होऊन, एकमेकांना मिस करत, मिनिटा-मिनिटांचे अपडेट सांगत मोबाइल फोन कवटाळून बसल्यामुळे जाणारा वेळ वेगळा. स्वतःच्या प्राणाहून प्रिय असलेला हा मोबाइल हातात असताना ना मुलांचे आई-वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष असत, ना कोण काय सांगतंय, काय म्हणतंय त्यांना समजतं. आपल्या आजूबाजूला काय चाललंय याच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो.
प्रेमाच्या अफलातून कल्पना मनात, डोक्यात घेऊन आजकालची युवा पिढी स्वतःच मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेते आहे. ज्या वयात जगाचा दुनियादारीचा आयुष्याचा थोडाही अनुभव आलेला नसतो. नुकतंच तारुण्यात पदार्पण करून अल्लड, अवखळ, चंचल विचार आणि मन यावर आपला ताबा नसणे, मोठ्या माणसाचं ऐकून घेण्याची तयारीसुद्धा नसणे या हेकेखोर स्वभावामुळे भविष्यात अशा मुला-मुलींना त्रास होऊ शकतो. समन्वयस्क असलेले शिक्षण सुरू असलेले हे मुलं मुली कुठेही आर्थिक दृष्टीने सेटल नसतात, ना त्यांना या वयात घरातून प्रेम विवाहाला मान्यता मिळेल अशी काही शक्यता असते. पुढे जाऊन देखील पुढील शिक्षणाच्या, नोकरीच्या निम्मिताने कोण कुठे जाईल यांचा काही भरवसा नसतो. आपण ज्याच्यावर प्रेम करत आहोत तो स्वतः देखील परिपूर्ण परिपक्व वैचारिक बाबतीत प्रगल्भ नसतो. आपल्या आयुष्यातील इतके अवघड आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायला जर दोघेही सक्षम नसतील, त्यांची आर्थिक, मानसिक, भावनिक कुवत तिथेच कमी पडत असेल, तर निव्वळ प्रेमाच्या नावाखाली शैक्षणिक वर्ष वाया घालवून टाइम पास करण्यातून काय साध्य होणार आहे, यावर विचार व्हावा. खरंच गांभीर्याने विचार केला अथवा सर्वेक्षण केले तर या वयातील किती प्रेमप्रकरणं यशस्वी होतात, त्यांची सर्वांच्या संमतीने अथवा वैयक्तिक पातळीवर निर्णय घेऊन का होईना लग्न होऊन पूर्ण आयुष्य ते व्यवस्थित व्यतीत करतात? यातील किती प्रेमप्रकरण खरंच लव्ह मॅरेजसाठी योग्य ठरतात आणि या वयातील लव्हला आयुष्यभर निभावतात? बहुतांश या प्रश्नाची उत्तर नकारात्मक येतील.
अनेक हुशार मुलामुलींची गुणवत्ता केवळ महाविद्यालयीन जीवनातील प्रेम आणि या प्रेमाचे साईड इफेक्ट यामुळे ढासळते. अनेक सुशिक्षित सुसंस्कृत मुलमुली वेळीच स्वतःला आवर न घालू शकल्यामुळे उज्वल भवितव्याला मुकतात. अनेक पालकांना असली प्रकरण समजल्यावर मनस्ताप, बदनामी याला सामोर जावं लागते. ज्या भावनेला,ज्या आकर्षणाला ही मुले प्रेम समजतात ते मुळात काय असत? ते खरं प्रेम असते तरी सातत्याने मुलामुलीत ब्रेक अप का होते? त्यातूनपण परत लग्न मात्र दुसऱ्याच व्यक्तीशी होत असते. मग या वयात जे अशक्य आहे त्या फालतू गोष्टींवर वेळ घालवणे खरच तेवढं गरजेचे असते का हा प्रश्न तारुण्यातील मुलामुलीने स्वतःला विचारला पाहिजे.