Friday, July 4, 2025

आंतरराष्ट्रीय योग दिनी ७५ मंत्री देशभरात करणार योगासने

आंतरराष्ट्रीय योग दिनी ७५ मंत्री देशभरात करणार योगासने

मुंबई (प्रतिनिधी) : दर वर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७५ मंत्री देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांवर योगासने करणार आहेत. पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या मैसूर पॅलेसमध्ये योगासने करणार आहेत.


गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात योगासने करणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे दिल्लीच्या लोटस टेम्पल येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरच्या झिरो माइल स्टोन येथे अर्थमंत्री निर्मला सितारामन दिल्लीच्या जंतर-मंतर येथे योगासने करणार आहेत.


धर्मेंद्र प्रधान हिमाचलच्या कांगडा किल्ला येथे, अनुराग ठाकूर हिमाचलच्या नालगढ किल्ला येथे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी लखनऊ येथे, भूपेंद्र यादव अयोध्या येथे, नरेंद्र सिंह तोमर मध्य प्रदेशातील खजुराहो येथे, अर्जुन मुंडा झारखंड येथील रांची येथे, पीयूष गोयल मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथे, प्रल्हाद जोशी कर्नाटकच्या हंपी येथे, नारायण राणे पुणे येथे योगासने करणार आहेत. देशभरातील नागरिकांनी योगाभ्यासाला आपल्या दिनक्रमात समाविष्ट करावे, असे आवाहन मोदींनी केले आहे.


२७ सप्टेंबर २०१४ रोजी यूएन जनरल असेम्ब्लीमधील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जाहीर केले की, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस किंवा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जाईल. २०१५ पासून जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा