हेलसिंकी (वृत्तसंस्था) : फिनलँडमध्ये झालेल्या पावो नूरमी गेम्स २०२२ मध्ये भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले. या पदकासह नीरजने ८९.३० मीटर भालाफेक करत स्वत:चाच ऑलिम्पिक विक्रम मोडत राष्ट्रीय रेकॉर्ड केला आहे.
या स्पर्धेत फिनलँडच्या ऑलिव्हर हेलेंडरने ८९.८३ मीटर भालाफेक करून सुवर्ण आणि ग्रॅनडाच्या अँडरसन पिटर्सने ८४.६५ मीटर फेक करून कांस्यपदक पटकावले. नीरज चोप्राने त्याच्या ८७.५८ मीटरच्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा केली, जो त्याने टोकियो ऑलिम्पिक दरम्यान साधला होता.
टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा जवळपास १० महिने स्पर्धांपासून दूर होता. एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर नीरज आता पुन्हा मैदानावर उतरला असून त्याने जवळजवळ ८९.३० मीटरपर्यंत भालाफेक करत दमदार कामगिरी केली. नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून नीरज फॉर्ममध्ये परत आल्याने आता त्याच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेनंतर नीरज फिनलँडमधील कुओर्तने गेम्समध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर तो डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगसाठी स्वीडनला रवाना होणार आहे.
नीरजने यावर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे ९० मीटरचे अंतर पार करण्याचे लक्ष्य आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी ९० मीटरचे लक्ष्य गाठण्याचा तो प्रयत्न करत आहे, जेणेकरून जगातील अव्वल थ्रोवर्सच्या यादीत त्याचा समावेश करता येईल. नीरजला १५ ते २४ जुलै दरम्यान अमेरिकेत होणाऱ्या जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्याआधी, ३० जून रोजी, तो स्टॉकहोममध्ये उच्चस्तरीय डायमंड लीग स्पर्धेत देखील भाग घेणार आहे. तो सध्या फिनलँडमधील कुओर्तने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात सराव करत असून २२ जूनपर्यंत तो तेथे असेल.