हिरालाल सोनवणे
सटाणा : नाशिक जिल्ह्याच्या बागलाणमधील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावरील पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीवर आंतराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रमुख मुनिजनांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. आज बुधवारपासून सलग पंधरा दिवस कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून आजच्या कार्यक्रमास देश-विदेशातील जैन बांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
मांगीतुंगी येथे सहा वर्षीय पहिल्या आंतरराष्ट्रीय जैन कुंभ मेळ्याची सुरुवात आज सकाळी ८ वाजेपासून झाली. गाजीयाबाद येथील जंबुप्रसाद जैन, विद्याप्रसाद, सुरत येथील संजय दिवान, अजय दिवान यांच्या हस्ते सपत्नीक जल अभिषेक व पंचअमृताने अभिषेक करण्यात आला. यावेळी ऋषभदेवाच्या १०८ फुट उंच असलेल्या मूर्तीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. मांगीतुंगी संस्थानचे पीठाधीश स्वामी रवींद्र कीर्ती महाराज यांच्या हस्ते चांदीचे कलश देऊन सन्मानित करण्यात आले.
मूर्ती परिसरात मालेगाव येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने लेझिम व ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आजपासून सलग पंधरा दिवस ऋषभदेवाच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. ५०० लिटर दूध, दही, केसर, हरिद्रा, अष्टगंध अशा सर्व औषधीयुक्त पंचामृताने अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यास देश-विदेशातून समाजबांधव येणार असून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कुंभमेळ्यानिमित्त मांगीतुंगी पंचक्रोशीला पुन्हा एकदा यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांच्या निवासस्थानाची व्यवस्थादेखील चोख ठेवण्यात आली आहे. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाहुण्यांची गडावर ने-आण करण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमांची जय्यत तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महामंत्री संजय पापडीवाल (पैठणकर) यांनी केले आहे. चेन्नई येथील कमल डोलीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पो. अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, सपोनि श्रीकृष्ण पारधी, कार्याध्यक्ष अनील जैन, विजयकुमार जैन, डॉ. जीवन जैन, इंजि. सी. आर. पाटील, प्रदीप जैन, भूषण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, प्रमोद कासलीवाल, नरेश बंसल, अशोक जोशी, प्रदीप ठोळे, मनोज ठोळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.