Sunday, October 19, 2025
Happy Diwali

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीची घसरण

लंडन (वृत्तसंस्था) : आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे. यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली असून तो तिसऱ्या स्थानावर आला आहे, तर आजी कर्णधार रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अग्रस्थानी आहे. तर त्यांचाच इमाम-उल हक दुसऱ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमरा पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड आहे. मॅट हेन्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या दहा अष्टपैलू खेळाडूमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. बांग्लादेशचा शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानावर आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि अष्टपैलू यामध्ये अव्वल दहा खेळाडूमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. फलंदाजीत भारताचा इशान किशन सहाव्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. लाबुशेन दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. इंग्लंडच्या जो रुटने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर स्मिथ तिसऱ्या आणि बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पाचव्या क्रमांकावर आहे.

Comments
Add Comment