पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी दिलेली शिकवण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात फडणवीस बोलत होते.
याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यात आहेत, याचा आनंद आहे. आपल्या संतांनी दिलेली शिकवणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणात दिसून येते, असे म्हणत फडणवीसांनी मोदींनीही सेवाधर्म जपल्याचे सांगितले.
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले !
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा !!
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओवींचं प्रत्यक्षात अनुकरण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जे का रंजले, गांजले त्यांचे सेवक बनून काम करण्याची शिकवण आपणास तुकाराम महाराजांनी दिली. तुकाराम महाराजांची हिच शिकवण नरेंद्र मोदी प्रधान सेवक बनून गरिबांच्या कल्यासाठी काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत. कारण, वारकऱ्यांमध्ये कोणी मोठे नसते, कोणी छोटं नसते. वारकऱ्यांमध्ये सर्वच सेवक असतात असेही फडणवीस यांनी सांगितले.