Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीसावरकर दर्शन प्रतिष्ठान

सावरकर दर्शन प्रतिष्ठान

शिबानी जोशी

एखादी व्यक्ती जेव्हा तन-मन-धन अर्पित करून, संपूर्ण त्यागबुद्धीने एखाद्या कार्याचा आरंभ करते, तेव्हा त्या कार्याला आराध्याचेही अधिष्ठान लाभते आणि ते काम पूर्ण करण्यासाठी ते त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात, हे “वीर सावरकर” या चित्रपटाचा पूर्णत्वाचा आलेख पाहताना आपल्याला दिसून येईल.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक महान देशभक्त होते; परंतु त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज समाजात पसरवले जात होते, जातात. हे गैरसमज खोडून काढण्याची गरज होती, त्यांचे कार्य देशातल्या युवकांपुढे येऊन त्यांनी प्रेरणा घ्यावी. यासाठी सावरकर विचार आणि सावरकर चरित्र सर्वदूर पोहोचवण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांना कायम वाटत असे. सुधीर फडके हे स्वतः सृजनशील कलाकार होते, त्यामुळे सावरकरांच्या साहित्याचं मोलही त्यांना माहीत होते. सावरकर हे केवळ राष्ट्रभक्तच नाही, तर एक उत्कृष्ट लेखक, कवी, तत्त्वज्ञ, विचारवंत, भाषा अभ्यासक होते आणि त्यामुळेच सुधीर फडके त्यांचे भक्त होते. एका भक्ताने आपल्या दैवतासाठी जे जे करायला पाहिजे. ते ते करण्याची सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांची इच्छा होती, तळमळ होती. बाबूजींना सावरकरांबद्दल तीव्र निष्ठा होती. सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. त्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली होती आणि त्यामुळेच १९८५च्या आसपास बाबूजी समविचारी तज्ज्ञांशी याबाबत नेहमी चर्चा करत असत. सावरकर विचार पोहोचवण्यासाठी तसेच त्यांच्याबाबतीत जाणूनबुजून होत असलेल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी काय करता येईल? या गोष्टीचा हे सर्वजण मिळून करत असत.

१९८०-९० च्या कालखंडात चित्रपट हे सर्वांसमोर जाण्याचे एक प्रभावी माध्यम होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ मराठी माणसांनाच नाही, तर संपूर्ण भारताला कळावेत यासाठी चित्रपटाची निर्मिती करावी, असा विचार सुधीर फडके यांच्या मनात आला आणि १९८५ साली “सावरकर दर्शन प्रतिष्ठान” या ट्रस्ट, विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अशा ज्येष्ठांच्या अनेक बैठका झाल्या आणि चित्रपटाला मूर्त रूप देण्याचे निश्चित झाले. यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, पद्मनाभ आचार्य, बिंदुमाधव जोशी, डॉक्टर आत्माराम कुलकर्णी, काही काळ रणजित देसाई, जनरल देबूर, मेजर प्रभाकर कुलकर्णी असे अन्य होते. त्याशिवाय चित्रपट पूर्ण व्हावा या उदात्त हेतूसाठी संघाच्या स्वर्गीय दामूअण्णा दाते, मोरोपंत पिंगळे, मुकुंदराव पणशीकर अशांनीही मोठं सहकार्य केलं होतं. त्यानंतर बाळासाहेब आपटे, दादा इदाते अशी मंडळीही जोडली गेली. शेवटच्या टप्प्यात बाबूजी स्वतः माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनाही भेटले होते. चित्रपटाची निर्मिती करणे हे सोपं काम नव्हतं. सृजनशीलतेच्या तसंच ऐतिहासिक सत्यतेच्या आधारावर चित्रपटाचं लेखन करणे, तो चित्रित करणे आणि यासाठी लागणारी आर्थिक मदत उपलब्ध होणे या सर्वच गोष्टी आव्हानात्मक होत्या; परंतु बाबूजींनी हे आव्हान एक व्रत म्हणून स्वीकारलं. त्यात अनेक अडचणी आल्या.

बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे अतिशय परफेक्शनिस्ट होते. त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीत लिहिताना ते अतिशय काळजीपूर्वक विचार करत असत. त्यामुळे या चित्रपटाच्या दोन-तीन वेळा पटकथा बदलल्या गेल्या, दिग्दर्शक बदलले गेले; परंतु सुधीर फडके यांच्या मनाचं समाधान होईपर्यंत त्यांनी त्याची पाठ सोडली नाही. नंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक वेद राही यांच्याशी त्यांची नाळ जुळली आणि वेद राही यांच्यावर पटकथा-संवाद तसेच दिग्दर्शनाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. “नुसतं बोलून नाही, तर करून दाखवणार”, यांपैकी बाबूजी असल्यामुळे त्यांनी स्वतः आर्थिक पुंजी जमा करण्याला सुरुवात केली. आपल्या गीत गायनाचे, वेळ पडली, तर दिवसाला दोन-दोन, तीन-तीन कार्यक्रम करून त्याने पैसा गोळा करायला सुरुवात केली. अगदी विदेशातही त्यांनी आपल्या गाण्याच्या कार्यक्रमाचे प्रयोग केले. अगदी अमेरिकेतही गीतरामायणाचे प्रयोग केले.समाजातील असंख्य दानशूरांनी आणि सावरकरप्रेमींनीसुद्धा आपापल्या कुवतीनुसार मदतीचा हात दिला आणि चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली.

चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतरही वितरणासाठी आर्थिक प्रश्न उभा राहिला होता आणि त्याच दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आले होते. वाजपेयीसुद्धा सावरकरप्रेमी होते. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांनी शेवटची दीड कोटी रुपयांची मदत “वीर सावरकर” या चित्रपटाला देऊ केली आणि चित्रपट वितरित झाला. चित्रपट सर्वांनीच उचलून धरला. सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने शाळा-शाळांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. जवळजवळ दहा लाख शालेय विद्यार्थ्यांनी हा चित्रपट त्यावेळी पाहिला. त्यानंतर तो चित्रपट व्हीसीडी, डीव्हीडी रूपातही उपलब्ध करून देण्यात आला. सावरकरांचे विचार देशभरात पोहोचवण्यासाठी या चित्रपटाची खूपच मदत झाली.

सुरुवातीला हिंदीमध्ये आणि त्यानंतर मराठीमध्ये आणि गुजरातीमध्ये या चित्रपटाचे डबिंग करण्यात आले. मराठी चित्रपटाचे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के. एस. सूदर्शन यांच्या हस्ते मुंबईत, तर गुजरती चित्रपटांच्या प्रदर्शनाला स्वतः नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आजही अनेक चित्रपट वाहिन्यांवर कधी कधी आपल्याला या चित्रपटाचं प्रक्षेपण पाहायला मिळत. २००२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर काही महिन्यांतच माननीय बाबूजी यांचं निधन झालं. बाबूजींची हा चित्रपट पूर्ण करण्याची जी दुर्दम्य इच्छा होती, त्यापुढे नियतीही झुकली. त्यांना तिने थोपवले असे म्हणायला हरकत नाही. आपली जीवनाची पूर्तता झाल्यावरच बाबूजींनी देह ठेवला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनचरित्र चित्रपटाच्या माध्यमातून आपण लाखो करोडो लोकांसमोर मांडलं; परंतु त्यांचे तेजस्वी, प्रभावी, आणि अभ्यासपूर्ण विचार तसेच त्यांचं देशभक्तीने भारलेलं वाड़मय आणि त्यांनी केलेले आधुनिक विचार सर्वांपर्यंत मांडणं गरजेचं होतं आणि म्हणूनच या प्रतिष्ठानचे कार्य तसेच पुढे सुरू ठेवण्याचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय केला आणि त्यानंतरही प्रतिष्ठानचे कार्य आजतागायत सावरकर विचारांचा प्रसार करण्यासाठी सुरू आहे. सध्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादा इदाते असून उपाध्यक्ष चित्रा फडके, रवींद्र साठे सचिव तर कोषाध्यक्ष म्हणून विनोद पवार काम करत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०५ साली विदेशी कपड्यांची होळी पुण्यामध्ये केली होती. त्याला २००५ साली शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून संस्थेने पुण्यात ‘विदेशी कपड्यांच्या होळीचा शतकउत्सव’ असा खूप मोठा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाला स्वतः प्रमोद महाजन उपस्थित राहिले होते.

त्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीबरोबर प्रतिष्ठानने दोन उपक्रम सुरू केले आहेत. एक उपक्रम म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सावरकर विचारांवर आधारित वाद-विवाद स्पर्धा. ही स्पर्धा २००७ पासून सुरू करण्यात आली. या स्पर्धेला दर वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळतो ४० ते ४२ महाविद्यालये या स्पर्धेत भाग घेतात. सावरकरांना जे अभिप्रेत विषय दर वर्षी घेतले जातात म्हणजे अगदी गाय हा उपयुक्त पशू आहे की नाही? या विषयापासून अनेक वेगवेगळे विषय याामध्ये दर वर्षी घेतले जातात. दुसरे म्हणजे “हिंदुत्व अध्ययन परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम” सुरू केला. हा उपक्रम गेली १३ वर्षे सुरू आहे. गेली १२ वर्षे दर वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने सावरकर साहित्य संमेलन आयोजित केले जाते. गेल्या वर्षी तर चक्क नवी दिल्लीमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. सावरकर विचारावर आधारित पुस्तकांची प्रकाशनेही केली जातात. आतापर्यंत अशी पाच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. गेल्या वर्षी बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांची शताब्दी झाली होती. त्या निमित्ताने सुधीर फडके यांच्यावरही एक मोठा विशेषांक प्रतिष्ठानने प्रकाशित केला होता.

सावरकर साहित्यातून कसे कळले पाहिजेत, हे दर्शवणारा “अनादी मी अवध्य मी” हा एक कार्यक्रम थोर विदुषी डॉक्टर अरुणा ढेरे यांनी लिहिला आहे. आता हाच कार्यक्रम हिंदीमध्ये सुद्धा तयार करण्यात आला आहे. आणखी वैशिष्ट्यपूर्ण एक उपक्रम इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आहे. खरा इतिहास लोकांसमोर मांडला पाहिजे. इंग्रजांनी शिकवलेला तो नाही. स्वतः सावरकरांनीसुद्धा ‘सहा सोनेरी पाने’मध्ये भारताचा इतिहास मांडला होता. तो इतिहास शिक्षकांना कळावा यासाठी शिबिरे आयोजित केली जातात.

सावरकर विचारांशी निगडीत अनेक संस्था, संघटनामधील कार्यकर्त्यांनी एकत्र यावे यासाठी त्यांचे संमेलन गेली पाच-सहा वर्षे दर वर्षी प्रतिष्ठानतर्फे भरवण्यात येते. सावरकरांवर वेळोवेळी प्रसारमाध्यमांमध्ये उगीचच राळ उठवली जाते, त्याला आपण कसा प्रतिसाद द्यायचा यावरही यावेळी विचारमंथन केले जाते.

“वीर सावरकर” हा चित्रपट देशातील अन्य भाषांमध्येही डब करून करण्याची त्यांची पुढची योजना आहे. याशिवाय सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा प्रत्येक राज्यात एक चॅप्टर म्हणजेच छोटी शाखा सुरू करण्याचाही विचार आहे, असे प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी सांगितले. राजस्थानमध्ये अशा प्रकारचा चॅप्टर उघडण्यासाठी नुकतीच एक बैठक झाली आहे. त्याला लवकरच अंतिम स्वरूप येणार आहे. हिंदुत्व विचार किंवा सावरकर विचारांचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या एखाद्या युवकाला दर वर्षी पाठ्यवृत्ती द्यावी, असाही आणखी एक विचार अंतिम टप्प्यात आहे. तशी पाठ्यवृत्ती नुकतीच घोषितही केली आहे.

देशभरात, विविध भाषांत ‘सावरकर विचार’ पोहोचावा आणि तरुणांनी तो अभ्यासावा. यातून सावरकरांचे विचार किती काळापलीकडचे होते, हे समजेलच. याशिवाय त्यांच्याबद्दलचे गैरसमजही दूर होऊ शकतील. यासाठी १९८५ पासून ३७ वर्षे सावरकर दर्शन प्रतिष्ठान वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून हे काम चोखपणे पार पाडत आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -