Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीभारतीय स्वातंत्र्य लढा अनेकांसाठी प्रेरणादायी- पंतप्रधान

भारतीय स्वातंत्र्य लढा अनेकांसाठी प्रेरणादायी- पंतप्रधान

मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथील राजभवनात क्रांतीगाथा गॅलरीच्या शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन केले. यावेळी नव्या जलभूषण इमारतीचे देखील त्यांनी उद्घाटन केले.

मराठी भाषेतून भाषणाचा श्रीगणेशा करताना पंतप्रधान म्हणाले की, महात्मा गांधींनी महाराष्ट्रातून भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला होता. महाराष्ट्राकडून देशाच्या इतर क्षेत्रांना वेळोवेळी प्रेरणा मिळाली आहे. संत तुकाराम ते डॉ. आंबेडकरांपर्यंत अनेकांनी समाजसुधारणेत योगदान दिले. तर छत्रपती शिवाजी आणि संभाजी राजांचे जीवन राष्ट्रप्रेमाची शिकवण देते.

भारताच्या स्वातंत्र्याबाबत बोलताना आपण अजाणतेपणाने काही गोष्टी विसरतो. स्वातंत्र्यासाठी साधने अनेक होती पण साध्य एकच होते. सामाजिक, कौटुंबिक आणि वैचारिक भूमिका काहीही असल्या, आंदोलनाचे स्थान देश-विदेशात कुठेही असले तरी लक्ष्य एकच होते, ते म्हणजे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वरुप लोकलही आणि ग्लोबलही होते. त्यामुळेच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

क्रांतीगाथा गॅलरीचे लोकार्पण करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्य समरातील वीरांना ही वास्तू समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राचे राजभवन गेल्या काही दशकांमध्ये अनेक लोकतांत्रिक घटनांचे साक्षीदार आहेत. आता येथे जलभूषण भवन आणि राजभवनात बनवलेल्या क्रांतीकारकांच्या गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मला सहभागी होण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

राजभवनाच्या इतिहासाला आधुनिकतेचे स्वरुप दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या अनुरुप शौर्य, आस्था, आध्यात्म आणि स्वातंत्र्य चळवळीच्या भूमिकेचेही दर्शन होते. इथून महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन सुरु केलेली जागा लांब नाही. या भवनाने स्वातंत्र्याच्या वेळी तिरंग्याला अभिनाने फडकताना पाहिले आहे. आता जे नवीन रुप झाले आहे त्यामुळे राष्ट्रभक्तीची मूल्ये आणखीन सशक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक सेनानी आणि महान व्यक्तीमत्वांचे स्मरण करण्याची ही वेळ असल्याचे मोदींनी नमूद केले. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळा आदी संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याबद्दल बोलायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते. आज दरबार हॉलमधून समुद्राचा विस्तार दिसतो तेव्हा मला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या वीरतेचे स्मरण होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही, तर महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत, जी एकवीसाव्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनणार आहेत. या विचाराने एकीकडे मुंबईतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होत आहे आणि त्याचवेळी इतर शहरांमध्येही आधुनिक सुविधा वाढवल्या जात आहेत. मेट्रो विस्तार, राज्यभरात सुरु असलेले नॅशनल हायवे पाहिले तर विकासाची सकारात्मक दृष्टी दिसते. राष्ट्रीय विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -