मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २९५६ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर चार कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या एकूण १८२६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज २१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७७,४९,२७६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९० टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,८३,११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१५,४१८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी २ रुग्ण ठाण्यात आढळले
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी २ रुग्ण ठाणे शहरात आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण २५ वर्षांची महिला तर दुसरा रुग्ण ३२ वर्षांचा पुरुष आहे. हे रुग्ण २८ आणि ३० मे २२ रोजी कोविड बाधित आढळले आणि हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जनुकीय क्रमनिर्धारणात सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए. २ या विषाणू उपप्रकाराचे आढळत असून त्या खालोखाल बी ए.२.३८ चे रुग्ण आढळत आहेत.