Monday, July 22, 2024
Homeदेशखेलो इंडिया युवा स्पर्धांमधून नूतन पिढीचा उदय : अनुराग ठाकूर

खेलो इंडिया युवा स्पर्धांमधून नूतन पिढीचा उदय : अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (हिं.स) : हरियाणा येथे इंद्रप्रस्थ क्रीडांगणावर खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२१ ची यशस्वी सांगता झाली. एकूण १३७ पदकांसह (५२ सुवर्ण) यजमान हरयाणा गुणतालिकेत अव्वल स्थानावर आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र (१२५ पदके – ४५ सुवर्ण) आणि कर्नाटक (६७ पदके – २२ सुवर्ण) अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिले. समारोप समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, हरयाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यासह हरयाणातील इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

क्रीडास्पर्धांच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष संदेश पाठवला. “कित्येक वर्ष देशाच्या प्रतिभावान खेळाडूंनी विविध व्यासपीठांवर अनेक क्रीडाप्रकारात केलेल्या कामगिरीने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. या सर्व खेळाडूंची प्रतिभा आणि कामगिरी हे जागतिक स्तरावर २१व्या शतकातील भारताच्या सतत वाढणाऱ्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे.”

“आज देशाच्या युवा खेळाडूंच्या आशा-आकांक्षा निर्णय आणि धोरणांचा आधार बनत आहेत. नवीन राष्ट्रीय धोरणात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाविषयक आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या समन्वयाने देशात उच्च क्रीडा संस्कृती आकार घेत आहे. क्रीडाक्षेत्रात अंगभूत गुण ओळखून, प्रतिभा आणि नैपुण्याच्या जोरावर निवड आणि प्रशिक्षणापासून खेळाडूंच्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकार देशातील प्रतिभावान तरुणांच्या पाठीशी आहे. देशाच्या प्रत्येक भागातल्या युवा खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि एक भारत श्रेष्ठ भारत मंत्राला अधिक सामर्थ्य प्रदान केले. युवावर्गाने खेळाच्या मैदानात त्यांच्यातील जोश द्विगुणित करून देशाचा सन्मान आणि आदर अधिकाधिक उंचीवर न्यावा अशी आमची इच्छा आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही याप्रसंगी स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. “१२ नवीन राष्ट्रीय विक्रम झाले आहेत आणि मी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करतो,” असे ठाकूर म्हणाले. खेलो इंडिया युवा स्पर्धांच्या प्रत्येक आवृत्तीत हरयाणा आणि महाराष्ट्र यांच्यात चुरशीची लढत होती आणि यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती, हरयाणाने पुन्हा सर्वोच्च सन्मान मिळवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. भारतातील क्रीडा महासत्ता राज्य म्हणून हरयाणाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

प्रो कबड्डीतील स्काउट्सची उपस्थिती ही युवा क्रीडा स्पर्धामध्ये स्वागतार्ह बाब होती, असे ठाकूर म्हणाले. हे हिरे शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देण्यासाठी पैलू पाडण्याकरिता हे स्काउट्स प्रत्येक मॅचच्या वेळी क्रीडांगणात उपस्थित होते. कबड्डीपटूंची पुढची पिढी या खेळातून उदयास येईल,” असे ठाकूर पुढे म्हणाले. या क्रीडास्पर्धांमध्ये घडलेल्या काही यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रसंगांचा केंद्रीय मंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
खेलो इंडिया युवा स्पर्धां २०२१ मधील १७ भारोत्तोलकांची १५ ते २६ जुलै दरम्यान ताश्कंद येथे होणार्या आगामी आशियाई युवा आणि कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. कर्नाटकचा जलतरणपटू अनिश गौडा याने एकूण ६ सुवर्ण पदकांसह खेळांमध्ये सर्वाधिक पदके जिंकली. अपेक्षा फर्नांडिस (जलतरण) आणि संयुक्ता काळे (तालबद्ध जिम्नॅस्टिक्स) या महाराष्ट्राच्या द्वयीने प्रत्येकी ५ सुवर्णपदके पटकावली.

खेलो इंडिया स्पर्धा काही महिन्यांत पुन्हा होतील या अपेक्षेसह अनुराग ठाकूर म्हणाले की “खेलो इंडिया युवा स्पर्धा आणि खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पुन्हा व्हाव्यात, जेणेकरून खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी पुन्हा संधी मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -