ठाणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा १३० करोड जनतेचा स्वप्नाचे सामर्थ्य असलेला नेता आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही. त्यामुळे ८ वर्षानंतर नागरिकांच्या डोळ्यात मोदींबद्दल आत्मविश्वास पाहायला मिळतो, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी ठाण्यात आयोजित ओबीसी कल्याण संमेलनात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद व केंद्र सरकारला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत भारतीय जनता पार्टी ओबोसी मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने ओबीसी कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त ओबीसीसाठी काम करणाऱ्या विविध मान्यवर व संस्थांचा सन्मान सोहळा ठाण्यातील कळवा येथील सायबा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, भाजप ओबोसी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सचिन केदारी, महिला अध्यक्ष नयना भोईर, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, दीपा गावंड,अर्चना मणेरा, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र भोईर, जिल्हा सरचिटणीस कैलास म्हात्रे, माजी उपमहापौर अशोक भॊईर, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी यांनी केले होते.