
मुंबई (हिं.स.) : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला बंगळुरू पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन प्रकरणी ताब्यात घेतले आहे. सिद्धांतसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहा जणांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी माध्यमांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील उलसूर पोलिसांनी रविवारी रात्री १२ वाजता एका हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात ५० हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही हायप्रोफाईल पार्टी सुरू होती. तेथून सिद्धांतसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिध्दांत कपूरने 'शूटआउट अॅट वडाला', 'चेहरे', अग्ली या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय 'भूल भुलैया', 'चुप चुप के', 'ढोल', 'भागम भाग' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शनही केले आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या भौकाल या सीरिजमध्ये चिंटू देढा नावाची भूमिका त्याने साकारली होती.