पुणे : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला जेरबंद करण्यात आले आहे. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यातील कच्छमधुन अटक केली आहे. संतोष जाधवसोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला ही पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही लॉरेन्स बिष्णोई टोळीत सहभागी होते. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
लॉरेन्स बिष्णोई टोळीचे जाळे महाराष्ट्रातही पसरलेले आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातील ११ तरुण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता या ११ जणांचा शोधण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून संतोष जाधव चर्चेत होता. त्यानंतर मुसोवाला हत्या प्रकरणात संतोषचे नाव पुढे आले. राण्या बाणखेलेच्या खूनानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. त्याचबरोबर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्याचे नाव घेण्यात आले.
पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला. त्यासाठी या वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधुन त्याला अटक करण्यात यश मिळवले. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलीसांनी सौरभ महाकाळ या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.
हे तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून बिष्णोई टोळीकडून प्रभावित झाले आणि गुन्हेगारीकडे ओढले गेले होते. त्याचबरोबर हे तरुण संपर्कासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करायचे. सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीची माहिती सिद्धेश कांबळेने दिली आहे. त्या माहितीची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. त्यासाठी पुणे पोलीसांची एक टीम दिल्लीत लॉरेन्स बिष्णोईची चौकशी करण्यासाठी उपस्थित आहे.
सिद्धू मुसेवाला आणि सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीमधे संतोष जाधवचा काय रोल आहे?, याचाही तपास करण्यात येणार आहे. संतोषच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक तरुण लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आहेत, असेही सांगण्यात येत आहे.