रमेश तांबे
एक होता ससा. लाल लाल डोळ्यांचा लांबलांब कानांचा. तुरूतुरू पळायचा, पळता पळता थांबायचा. चुटूचुटू खाता खाता पटकन पळून जायचा. ससा होता खूपच भित्रा. भितीची त्याच्या कारणं सतरा. जरा कुठे खुट्टं झालं, ससा लगेच सावध व्हायचा अन् बिळात जाऊन लपायचा.
एके दिवशी ससा हिरवे हिरवे गवत खात होता. इकडे तिकडे टुकूटुकू बघत होता. तेवढ्यात तिथे आली खारुताई. तीसुद्धा भित्राबाई. जरा काही वाजलं की तुरूतुरू पळायची. एका क्षणात पानाआड लपायची. मागच्या पायावर बसून दोन्ही हातात गवत धरून खाताना सशाने पाहिले खारुताईला. ससा म्हणाला, “खारुताई खारुताई आज इथे काय करतेस, मित्रांना सोडून एकटी कशी फिरतेस.!” खारुताई उदासपणे म्हणाली, “काय सांगू ससेभाऊ आमची कहाणी, कोण ऐकणार आमची रडगाणी.”
ससा म्हणाला, “का काय झाले, कुणी का उगा बोलले तुला!” खारुताई म्हणाली, “मला नाही रे आम्हा सर्वांनाच म्हणतात, ‘सगळ्या खारी भित्र्या भागूबाई’ आता तूच सांग हा आमच्यावरचा डाग कसा पुसू, दुःखातदेखील कशी हसू!”
ससा म्हणाला, “खारुताई खारुताई तू नाही एकटी, तुझ्यासारखेच आम्ही आहोत धांदरट. आम्ही म्हणे सारेच घाबरट एक नंबरचे म्हणे आहे भित्रट! आमच्यावर लोकांनी रचलित गाणी, भित्र्या सशांवर लिहिल्यात गोष्टी. जिकडे जाऊ तिकडे आमचीच निंदा लोकांना नाही दुसरा धंदा!”
खारुताई म्हणाली, “ऐका जरा ससेभाऊ, आपण काही तरी विशेष करूया. लोकांच्या मनात जाऊन बसूया.” मग दोघेही करू लागले विचार, काय बरे करता येईल. तेवढ्यात ससा म्हणाला, “अगं खारुताई मी कालच वाचलंय त्या तिकडे म्हणे श्रीराम आलेत. सीतामाई हरवली म्हणून दुःखी झालेत. समुद्रात त्यांना बांधायचा आहे पूल, मदत त्यांना केलीस तर छान होईल’!” खारुताई म्हणाली, “हो हो मी जाईन मदतीला, मदत करीन मी पूल बांधायला.”
खारुताई एकदम खूश झाली. आनंदाने उड्या मारू लागली. मदत करीन रामाला, सांगेन सगळ्या लोकांना! ससेभाऊ ससेभाऊ खारुताई म्हणाली, “अहो कालच मी हत्तींचं बोलणं ऐकलं. म्हणे इंद्रदेवाला चंद्रावर फिरवायची आहे गाडी, गाडी फिरवायला हवा तगडा गडी!” तोच ससा ओरडला, “काय इंद्रदेवाची गाडी!” हो हो हो… खारुताई म्हणाली. “तिथं तुझ्या आवडीची गोकर्णीची पाने आहेत खायला. छान छान हिरवं हिरवं गवत आहे चरायला.” तसा ससा अगदी पोहोचला इंद्रदेवाच्या राजवाड्यात. तिथं त्याला दिसली इंद्राची गाडी! इकडे खारुताईदेखील रामाच्या सेवेत पोहोचली अन् चिमूटभर माती समुद्रात टाकू लागली.
ससा अन् खारुताई दोघे गेले स्वप्नात. कोण सेवेत, तर कोण दरबारात! तेवढ्यात जोराचा आला वारा, गळून पडली पाने बारा. टपटप पाने पडली सशाच्या अंगावर, सळसळ सळसळ पाने आली खारुताईच्या डोक्यावर! तसे दोघेही घाबरले खूप, पळून गेले दोघेही झाले क्षणात गुडूप!
पण गोष्ट इंद्राच्या गाडीची अन् श्रीरामाच्या पुलाची कुणी ऐकली कुणास ठाऊक? पण पोहोचली साऱ्या रानात, रानातून गेली माणसांमुलांत! तेव्हापासून प्रत्येकाला चंद्रावर ससा दिसतो अन् रामाच्या सोबत खारुताईला पाहतो. मग काय दोघांवर लिहिली कितीतरी गाणी अन् किती किती गोष्टी!