अॅड. रिया करंजकर
मोबाइलचा गेम आणि समाजमाध्यम आईचा कर्दनकाळ ठरले. सोळा वर्षांच्या मुलाने खेळणाऱ्या हातामध्ये एक हत्यार उचललं आणि जन्मदात्या आईची हत्या केली. एका खेळासाठी त्याने ही हत्या केली. खेळ महत्त्वाचा की आपली जन्मदात्री?
मोबाइल ही दिसायला छोटीशी वस्तू आहे, पण त्याचं व्यसन जर लागलं, तर आयुष्याची बरबादी आहे. काही वर्षांपूर्वी शाळेत मोबाइल घेऊन जाणं मान्य नव्हतं, पण या कोरोना काळामध्ये मोबाइलमध्ये शाळा भरू लागलेली आहे आणि त्यामुळे सर्रास सर्वच मुलांच्या हातात मोबाइल दिसू लागलेत. अभ्यासाव्यतिरिक्त मुलं या मोबाइलचा नको त्या गोष्टीला वापर करू लागले. नातेवाइकांचे आलेले फोनही आई-वडिलांना न सांगता ही मुलं कट करू लागले. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये तडे निर्माण होऊ लागलेत. मोबाइलमुळे अनेक मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेली आहेत.
लखनऊमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी घडलेली घटना, आई-वडील आणि दोन मुलं असा त्यांचा छोटासा परिवार. वडील सैन्यामध्ये अधिकारी, त्यामुळे त्यांचं सतत वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोस्टिंग असायचं आणि सध्या ते बंगालमध्ये होते. साधना व सोळा वर्षांचा एक मुलगा. दहा वर्षांची मुलगी. असे तिघेजण लखनऊमध्ये राहत होती. कोरोना काळामध्ये साधनाच्या सोळा वर्षांच्या मुलाची मोबाइलशी जवळीक वाढली व तो सतत मोबाइलमध्ये पब्जी व समाजमाध्यमांमध्ये सक्रिय असायचा, दिवसभर तो पब्जी खेळत असायचा. त्यामुळे साहजिकच साधना त्याला ओरडत असायची. कारण, ते एका सैनिकाचे घर होतं आणि सैनिकाचे घर म्हटल्यावर तिथे शिस्त आलीच. त्यामुळे साधना आपल्या दोन्ही मुलांना शिस्त लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण तिच्या मुलाला ते आवडत नव्हतं आणि पटतही नव्हतं की सतत आई आपल्याला ओरडत आहे. याचा राग त्याला प्रत्येक वेळी येत होता.
त्या दिवशी सकाळपासून साधनाचा मुलगा पब्जी खेळत होता म्हणून साधनाने त्याला चांगला दम दिला होता. याचा राग त्या मुलाच्या मनात राहिला व साधना दुपारी झोपल्यानंतर आपल्या वडिलांची गन या मुलाने घेतली व झोपलेल्या आईवर त्याने गोळ्या झाडल्या. छोट्या बहिणीने बघितलं, तर तिलाही त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन धमकावून ठेवलं. झोपेतच साधनाचा जीव गेला. पोलिसांना याची खबर मिळाल्यानंतर साधनाच्या मुलाची चौकशी केली असता, त्याने असे सांगितले की, “दुपारी कोण तरी इलेक्ट्रिशन माणूस घरी आलेला होता. त्याने हे कृत्य केलं असावं.” पण पोलिसांचा यावर विश्वास नव्हता. कारण, घरातील कोणती वस्तू चोरीला गेलेली नव्हती. छोट्या मुलीची चौकशी केली असता ती घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना जाणवली. त्याच्यामुळे पोलिसांचा संशय या मुलावर आला. पण ज्यावेळी साधनाच्या मुलाला विश्वासात घेऊन विचारण्यात आलं, तेव्हा झालेला प्रकार साधनाच्या मुलाने पोलिसांना सांगितला. आईचा राग आला. मला खेळताना ती ओरडत होती म्हणून मी हे कृत्य केलं. सोळा वर्षांच्या मुलाने खेळणाऱ्या हातामध्ये एक हत्यार उचललं आणि जन्मदात्या आईची हत्या केली. एका खेळासाठी त्याने ही हत्या केली. खेळ महत्त्वाचा की आपली जन्मदात्री महत्त्वाची? नासमज वयामध्ये मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळला. एका मोबाइलच्या गेमसाठी आपलं हसतं-खेळतं घर तो गमावून बसला.
माणसांना व्यसनं अनेक प्रकारची असतात व त्यात त्यांची आयुष्य बरबाद होतात. या मोबाइलच्या गेममुळे तरुण मुलांची आयुष्य बरबादीच्या वाटेवर प्रस्थान करत आहेत...
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)