जम्मू (हिं.स) : केंद्र सरकारला शांततामय आणि विकसित जम्मू काश्मीर हवे असून, सर्वच आघाड्यांवर जम्मू काश्मीरचा सर्वांगीण विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी दिली. जम्मूच्या संमेलन केंद्रात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२०१९ साली केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर, या भागात विकासाची कवाडे खुली झाली आहेत. याचा प्रत्यय आपल्याला यातूनच येतो की, आता येथे केंद्राच्या सर्व योजना, जसे की प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, शिष्यवृत्ती योजना,अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु झाली आहे.
अनेक केंद्रीय योजनांची इथे १०० टक्के अंमलबजावणी सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या लोकांना, सर्व आघाड्यांवर मग ते स्वतःचे घरकूल असो, उपजीविका असो, या सगळ्या सुखसुविधा देण्यास सरकार पूर्ण कटिबद्ध असल्याचाच हा पुरावा आहे. सरकारला येथे सामाजिक स्थैर्य निर्माण करायचे आहे.
या दौऱ्यात रामदास आठवले यांनी जम्मू आणि काश्मीरमधील समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह, समाज कल्याण योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित आढावा बैठक घेतली. या बैठकीला, समाज कल्याण विभाग, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक विवेक शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.