डॉ. स्वप्नजा मोहिते
जिंदगी… कभी मायूस हो कर देखा जो मैंने तुझे… तब तेरी खिलखिलाती हँसी मिल गयी मुझे… मेरी आँखों से उमडती बारिश… तब घुल सी गयी तेरे बादलों में… और फिर रंगो के आँचल में थाम लिया तुने मुझे! आज का कोण जाणे उदासी घेरून टाकतेय तिला. घरातले सगळेजण आपापल्या विश्वात मग्न आहेत. मुलं शाळेत… तिचा जोडीदार त्याच्या ऑफिसमध्ये प्रत्येकाला एक अदृश्य घड्याळ बांधलंय आणि प्रत्येकजण त्याच्या काट्यांनुसार धावतोय. ती मात्र आहे तिथेच आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूसारखी! खरंच तिथंच आहे ती? तिनं कपाट आवरता आवरता मिळालेल्या आपली कागदपत्रांच्या फाइलवर नजर टाकली. शालेय स्तरापासूनची जपलेली सर्टिफिकेट्स भरलीत त्यात. हे राज्यस्तरावरील निबंध स्पर्धेत पहिला नंबर आल्याचं हे राष्ट्रीय स्तरावरचं वक्तृत्व स्पर्धेचं… हे अमक्यातल्या प्रथम क्रमांकाचं हे तमक्यातलं सर्टिफिकेट्सची पानं उलटता उलटता, ती तिच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटवर येऊन पोहोचली. एम. एस्सी. इन मॅथेमॅटिक्स! वर्षानुवर्षे प्लास्टिकच्या त्या फोल्डरमध्ये राहून राहून चिकटून बसलीत. सगळी सर्टिफिकेट्स त्यात आयुष्य दिवस – रात्रींच्या क्षणांना चिकटून राहावं तसं! तिनं फोल्डरमध्ये हात घालून ती सर्टिफिकेट्स सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरची अक्षरं प्लास्टिकला चिकटत आहेत हे पाहिल्यावर, तिनं तो प्रयत्न सोडून दिला. नाहीतरी कुठे घेऊन जायचेय हे कागद? कागदाच्या चिटोऱ्यागतच तर उरलय त्यांचं महत्त्व! तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. किती स्वप्न रंगवली होती ती डिग्री घेताना! तिच्या डोळ्यांसमोर तो तिचा पोस्ट ग्रॅज्युएशन कॉनव्होकेशनच्या वेळचा काढलेला फोटो आला. टिपिकल गाऊन आणि ग्रॅज्युएशन कॅप घातलेला हातात डिग्रीची पुंगळी डोळ्यांवर येणाऱ्या कॅपच्या झिरमिळ्या आणि काहीतरी अचिव्ह केल्याची मनातली भावना!
आपल्या फोटोत मनाचं चित्र उमटलंय का? तिला परत प्रकर्षानं तो फोटो बघावासा वाटून गेले. कुठे ठेवलाय कोण जाणे! सगळंच विस्कळीत झालंय. आयुष्य त्यात कुठेतरी हरवूनच गेला तो फोटो. विमनस्कपणे तिनं ती फाइल परत कपाटात, आपल्या कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली खुपसून टाकली. नकोच तो विचार! पण तरीही मन परत परत त्या विचारात गुरफटत राहतं, त्याचं काय करू? तिनं थकल्यागत आपलं डोकं कपाटाच्या आरशावर टेकवलं. त्याचा थंड स्पर्श तिला खूप सुदींग वाटून गेला. अचानक तिचं लक्ष आपल्या प्रतिबिंबाकडे गेलं. थकलेले डोळे, त्याखालची काळी वर्तुळं केसातल्या नव्यानं उमटलेल्या रूपेरी रेषा आणि चेहऱ्याची बदलती जॉमेट्री. अरे, हा माझाच चेहरा आहे? तिला तो समोरचा चेहरा एकदम परका वाटून गेला. कसा बदलला हा माझाच चेहरा? तिला खूप मागचा पार भूतकाळातला आपला चेहरा आठवला. अगदी खूप सुंदर नाही पण स्मार्ट म्हणता येईल, असा सावळा चेहरा, बोलके डोळे आणि कमरेपर्यंत रुळणारे केस, नाजूक जिवणी आणि कुणालाही आपलेसे करणारे हसू! याही पलीकडे असणारी बुद्धिमत्ता! उगीच नव्हता तिनं मॅथ्स विषय निवडलेला! वर्गातल्या स्कॉलर
विद्यार्थ्यांमध्ये गणली जायची ती! तिला परत त्या भूतकाळात परतावंस वाटलं. अगं कसला रुक्ष विषय घेतला आहेस? मैत्रिणी चिडवायच्या तिला. तिला तर जिंदगीच्या प्रत्येक वाटेवर गणितातले सिद्धांत भेटत राहायचे. अगं या फुलाच्या पाकळीच्या रचनेतही गणित आहे. बघ नं, कशी पाकळीआड पाकळी, त्याच त्या ठरावीक मोजमापात, कोनात रचली आहे. त्यांचं एकमेकांशी गुणोत्तर. ती गणिताच्या भाषेत बोलायला लागली की, तिच्या मैत्रिणी काहीतरी निमित्त काढून सटकायच्या आणि ती बसायची जोसेफ माझूरचं युक्लिड इन रेनफॉरेस्ट हे पुस्तक घेऊन. त्यातल्या ग्रीक बेटांवरल्या साहसी कथांमधून तिला भेटायचे इन्फिनिटी आणि प्रोबॅबिलिटीचे कन्सेप्ट्स! मॅथ्स म्हणजे नुसत्या बेरजा, वजाबाक्या, भागाकार, गुणाकार नसतात तर त्यातूनही जीवनाचं सत्य उलगडत जातं. तिला मैत्रिणींना ओरडून सांगावंसं वाटे. तिला रूबेन हर्शचं व्हॉट इज मॅथेमॅटिक्स रिअली आवडायचं. एका प्रोफेशनल मॅथेमॅटिशिअनने मांडलेल्या तत्त्वज्ञानातून गणिताकडे जाणाऱ्या संकल्पना तिला भावायच्या. हरवून जायची ती तिच्या विश्वात! यांच्यासारख गणित शिकवता आलं पाहिजे. तिला शिक्षिका व्हायचं होतं. एक वेगळी शिक्षिका! पण… हा पणच आडवा आला आणि एम.एस्सी. मॅथेमॅटिक्स पदवी हातात पडताच घरच्यांनी तिचं लग्न ठरवून टाकलं. तो तरी समजून घेईल माझी आवड… तिला वाटलं! पण लग्नानंतर त्याचं करिअर… त्याचा जॉब… त्याची महत्त्वाकांक्षा… यात तिचं स्वप्न कुठेतरी अडगळीत पडून राहील… तिच्या त्या सर्टिफिकेट्सच्या फायलीगत! कॅलेंडरची पानं बदलत गेली. भिंतीवर नवी कॅलेंडर्स येत राहिली. काहीतरी करायच्या उर्मी मनात दफन होत राहिल्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डेचा फोटो काळाच्या ओघात हरवून गेला.
दिवस रात्रीचं रहाट गाडगं फिरताच होतं. दिवस कधी सुरू होतो आणि कुठे संपतो… कळतच नव्हतं. तुझ्या हाताला चव आहे, नवरा म्हणायचा, मम्मा, आज पिझ्झा बनव. माझा ग्रुप येणार आहे प्रोजेक्ट करायला. मुलगी सांगायची. त्यांचं प्रोजेक्ट डिस्कशन रंगात आलं असायचं. अगं तो पार्ट या डायरेक्शननं लावला तर… ती मदत करायला जायची तेव्हा, ओ मम्मा… प्लिज! तू पिझ्झा कर. लिव्ह धिस टू मी! लेक ठसक्यात सांगायची तेव्हा तिच्या ग्रुपमध्ये होणाऱ्या खाणाखुणा तिला अस्वस्थ करायच्या. मनातल्या वेदना खडबडून जाग्या व्हायच्या तेव्हा! पण पिझ्झ्याचे सारखे कट्स करण्यापलीकडे ती काहीच करत नसे आता. तुला नाही समजायचं! हे परवलीचं वाक्य आता नवऱ्यापाठोपाठ मुलांकडूनही उच्चारलं जायचं. आपण एक मठ्ठ, मंदबुद्धी व्यक्ती असल्याचं फिलिंग आता जास्तच उमटायचं तिच्या मनात!
तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर तिला कमी लेखल्याची खंत उमटली आहे. श्रीदेवीच्या क्लासचे प्रोफेसर तिचं सर्टिफिकेट तिला दाखवतात. शी हॅज प्रुव्हड हरसेल्फ… शी इज समवन!! तिच्या प्लेटमधली आंबोळी आणखीनच थंड झालीय. मैं नहीं इक जर्रा की तुम उडा दो मुझको खाक समझके… यह जर्रा भी मायने रखता हैं… की सुरज के सामने, आस्तित्व एक दिखा सकता हैं… की जर्रा जर्रा जुडकर ही जमी बना सकता हैं… हर जर्रा भी कुछ तो बन सकता हैं!
कपाळाची ठणकती नस आता थोडी शांतवली आहे. तिनं कपाटाच्या तळाशी, कपड्यांच्या खूप खाली खुपसलेली फाईल परत काढली. समोरचा कॉम्पुटर ऑन करून, नेटवरून ती जॉब सर्च करायला बसलीय. उशीर झालाय खरा, पण वेळ गेलेली नाहीये अजून. तिच्या मनातलं स्वप्न परत जागं झालंय! दुसऱ्या विंडोतून तिनं शोधलेलं पर्सी डायकॉनीस आणि रॉन ग्रॅहमचं मॅजिकल मॅथेमॅटिक्सचं ई – बुक डाउनलोड होतंय!