Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीयुरोप-भारत शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे -कोश्यारी

युरोप-भारत शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे -कोश्यारी

राज्यपालांच्या उपस्थितीत युरोप दिन संपन्न

मुंबई (हिं.स.) : युरोप भारताचा महत्वाचा भागीदार असून भारत आणि युरोपीय देशांमध्ये पर्यावरण, संरक्षण व स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात मोठे सहकार्य सुरू आहे. युरोप जगातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असून भारताला देखील युरोपशी व्यापाराचा मोठा इतिहास आहे. भारत व युरोपीय देशांमधील संबंध केवळ व्यापार व गुंतवणूक या विषयांपुरते मर्यादित न राहता उभयपक्षी शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध देखील वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे आज व्यक्त केली.

भारत आणि युरोपीय समुदायांमधील संबंध स्थापन होण्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून कौन्सिल ऑफ युरोपियन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेतर्फे शुक्रवारी मुंबईत ‘युरोप दिन २०२२’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला युरोपिअन युनिअनच्या भारतातील व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर, युरोपिअन युनिअन चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनीष भटनागर, फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले, चेंबरच्या संचालक श्रीमती डॉ. रेणू शोम तसेच विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व उद्योग-व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने युरोपमधील विद्यापीठे तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये सहकार्य अधिक वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात राज्यपालांनी युरोपिअन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्याचे कौतुक केले.

युरोपीय समुदाय भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असल्याचे सांगून फ्रांस व भारत राजनैतीक सहकार्याची ७५ वर्षे साजरी करीत असतानाच युरोपिअन युनिअन व भारत आपल्या सहकार्याची ६० वर्षे साजरी करीत आहे हा चांगला योगायोग आहे, असे फ्रान्सचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले म्हणाले.

भारत व युरोपीय देशांचा व्यापार १०० अब्ज डॉलर इतका असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी योग्य संधी आताच असल्याचे युरोपियन युनियनच्या व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर यांनी यावेळी सांगितले. डॉ रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -